विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागेल या धसक्याने पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण गेल्या आठवड्यात घाईघाईने उरकण्यात आले. जोगेश्वरीच्या पालिकेच्या विभाग कार्यालयाचे असेच घाईघाईत उद्घाटन करण्याचा कार्यक्रम निश्चित झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम असल्याने पालिका आयुक्तांपासून सारे झाडून अधिकारी उपस्थित होते. सायंकाळचा कार्यक्रम पण रात्रीचे आठ वाजले तरी मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे मुंबई आणि ठाण्यात भरपूर कार्यक्रम. मुख्यमंत्री नियोजितस्थळी पोहचले पण तेव्हा वाजले होते मध्यरात्रीचे २ ! मुख्यमंत्री येणार म्हणून अधिकाऱ्यांना थांबण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण स्थानिक नागरिक उशीर झाल्याने एव्हाना घरी परतले होते. अशा पद्धतीने पालिकेच्या विभाग कार्यालयाचे अखेर मध्यरात्री उद्घाटन झाले.

सायबांचे पोरांनी मनावर घेतले…

गेल्या दोन दिसापासून पारावर खाली मान घालून बसणारी पोरं गप्प का? गावात एखांद्याबी पोराच्या हातात मोबाइल दिसना झाल्ता. सरकारनं बंदी आणली म्हणावी तर इलेक्शनच्या वक्ताला ते हुणारच नाही याची गणूतात्याला खात्रीच हुती. सकाळचे, जेवताना आणि रातचं अंथरुणावर पडल्यावरही मोबाइल हातात ठेवणारी पोरं शाणी कशी झाली, काय इप्रित घडलं की काय याची चिंता गणूतात्याला लागली. पारांवर कुणाला तरी इचारावं तर सगळी पोरं तालमीत गेल्याचा कळलं. गणूतात्यानं दिवसाउजेडी बंद असलेल्या तालीमकडं चक्कर मारली तर तरणी पोरं जोर बैठका काढत असल्याच दिसलं. गणूतात्याला राहवलं न्हाय. वस्तादला पुसलंच. काय वस्ताद दिवाळीचं मैदान हाय काय? पोरं जोर-बैठका मारल्यात. वस्ताद म्हणाला, कुठलं काय तात्या, परवा सभंत सायबानं सांगितल न्हाय का, मुख्यमंत्री हुयाला लई उठाबशा काढायला लागत्यात. तवापसनं तालमीत दंगायोट उठलाय. पाच उठाबशा काढल्या की पन्नास झाल्याचं मोजत्यात.

हेही वाचा >>>महाराष्ट्रात ३१ जागांवर ‘खेला’ होणार? मतविभागणी जवळपास समसमान, ‘काठावरच्या’ मतदारसंघांत कुणाची होणार सरशी?

उठा उठा दिवाळी आली…

साताऱ्यातील वाई येथे शिवस्वराज्य यात्रा आलेली होती. या वेळी जयंत पाटील आपले छोटे खाणी भाषण उरकून निघून गेले. मग प्रमुख वक्ते अमोल कोल्हे उभे राहिले. त्यांनी भाषणाच्या ओघात, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड- किल्ले, वाई आणि प्रतापगडचा रणसंग्राम याचा इतिहास सांगत अनेक मुद्दे सांगितले. अफजलखान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या. कार्यकर्ते ते मन लावून ऐकत होते, आणि एकदम त्यांच्या लक्षात आले की आपण विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत आलो आहोत. एकदम ते निवडणूक प्रचाराकडे सरकले. ते कार्यकर्त्यांना म्हणाले, उठा उठा दिवाळी आली आणि..! ही घोषणा सर्वांना माहिती आहे, परंतु आता ही घोषणा ‘उठा उठा दिवाळी आली आणि नको त्यांना पाडायची वेळ झाली’ असे सांगून गेले.

(संकलन : इंद्रायणी नार्वेकर, दिगंबर शिंदे, विश्वास पवार)