विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गेली पाच वर्षे संताप, चिडचीड व्यक्त केल्यावर पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देऊन भाजपने अखेर त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. वास्तविक पंकजाताईंना राज्याच्या राजकारणात राहण्याची अधिक इच्छा होती. पण बहिण प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारून पंकजा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. चुलत बंधू धनंजय मुंडे यंदा बरोबर असल्याने तेवढी धाकधूक नसली तरी ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असे स्वत:लाच म्हणवून घेणाऱ्या पंकजा यांच्यासाठी निवडणूक तेवढी सोपीही नाही. असे असतानाच त्यांचे भगिनी प्रेम उफाळून आले. ‘प्रीतमताईंची काळजी करू नका, मी तिला नाशिकमधून उभे करीन’, असे पंकजा म्हणाल्याने त्याची पक्षात प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक. प्रीतम मुंडे यांचे सासर नाशिकचे. यामुळे नाशिकचा उल्लेख झाला. गेली पाच वर्षे स्वत:च्या राजकीय पुनर्वनसासाठी झगडावे लागलेल्या पंकजा मुंडे या बहिणीला उमेदवारी देऊ शकतात का? हा भाजपच्या नेतेमंडळींना पडलेला प्रश्न. दुसरे म्हणजे पंकजाताईंच्या वक्तव्याने नाशिकमधील भाजपची मंडळी अस्वस्थ झाली. आधीच लोकसभेच्या जागेवर शिंदे गट दावा सोडण्यास तयार नाही. विधानसभेला अनेक इच्छुक. त्यातून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देणार कुठून? बहिणीला उमेदवारी देण्याईतपत पंकजा मुंडे यांचे पक्षात एवढे वजन वाढले का? असे प्रश्न भाजपच्या स्थानिक नेतेमंडळींना पडले आहेत. कारण स्वत:च्या उमेदवारीसाठी पंकजाताईंना पाच वर्षे वाट बघावी लागली होती. आधी बीड सांभाळा हा छगन भुजबळ यांनी दिलेला सल्ला पंकजाताई कितपत गांभीर्याने घेतात हे आता बघायचे. पंकजाताईंच्या भगिनी प्रेमामुळे त्यांचे हितशत्रू मात्र निश्चितच वाढणार आहेत.
एक रुपया, एक रुपया जमवून..
वायव्य मुंबई मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारात काही नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. गोरेगाव येथील मराठा युवा प्रतिष्ठानने ‘एक रुपया, एक मत’ ही अभिनव मोहिम राबविण्यास सुरुवात केली असून या मोहिमेत घरोघरी जाऊन एक रुपया जमा केला जात आहे. या मोहिमेला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येते. वडिल गजानन कीर्तिकर अनेक वर्षे लोकप्रतिनिधी, स्वत: अमोल कीर्तिकर यांची आतापर्यंतची एकूणच ‘कारकीर्द ’ यातून कीर्तिकर यांना अशा पद्धतीने निधी उभा करावा लागतो याबद्दल चर्चा होणे स्वाभाविक. मतदारांचे प्रेम जपण्यासाठी उमेदवारांना असेही उपक्रम राबवावे लागतात.