सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपने खासदार संजयकाका पाटील यांना पहिल्या झटक्यात उमेदवारी जाहीर केली. महाआघाडीनेही पैलवान चंद्रहार पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी मला की तुला या वादात अडकली. यातूनही आघाडीने संयुक्तपणे पैलवानांचीच उमेदवारी अंतिम करत कार्यकर्त्यांना प्रचाराला लागण्याचे आदेश दिले. मात्र निवडणुकीत रंग अजूनही भरेना. भाजपचा प्रचार सुरू असला तरी चुरस दिसत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोष काही केल्या येईना झालाय. यासाठी मंगळवारी जतमध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता व्यासपीठ मिळाल्यावर भाषणबाजी आलीच. मात्र लोकसभेच्या प्रचाराचे व्यासपीठ असताना एकच छंद असलेल्या नेत्याने विधानसभेसाठी मी तयार आहे असे सांगत आपल्या प्रचाराची हौसही भागवून घेतली. म्हणूनच कार्यकर्ते म्हणत होते, ‘ओ शेट, तुम्ही नादच केलाय थेट, नुसती भाषणबाजीच हाय ग्रेट.’
उमेदवार नव्हे वधू पक्ष
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता भरात आला आहे. महायुती असो की महाविकास आघाडी दोन्हीकडे तीन मुख्य पक्ष. शिवाय सहयोगी, पाठिंबा देणाऱ्या पक्षांची संख्या वेगळीच. हे सर्वपक्षीय कडबोळे एकत्रित जमवून प्रचाराला गती द्यायची म्हणजे एक म्हणजे डोकेदुखी. सर्वाचे मानपान करताना, समजूत काढताना नेतृत्वाची दमछाक होत असते. कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या पहिल्याच मेळाव्यात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना समजावताना यासाठी लग्नातील उदाहरण दिले. उमेदवारी आपल्याकडे असल्याने आपली बाजू वधू पक्षासारखी आहे. मित्र पक्षांना पुढे करून, मान देऊन आपण त्यांच्यासोबत जायला शिकले पाहिजे. हाच शब्द आता आघाडी असो की महायुती सगळीकडे वापरला जात आहे. उमेदवारी असणारा पक्ष सध्या वधू पक्षाच्या भूमिकेत नम्रतेने वागताना दिसत आहे. मित्र पक्षाची मंडळी वर पक्षाचा तोरा मिरवत आहेत. निवडणुकीतील लग्नाची ही राजकीय रेशीमगाठ सध्या चर्चेत आहे.
हेही वाचा >>>भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
खासदारांची इच्छापूर्ती होणार का ?
प्रथम काँग्रेस नंतर भाजप नंतर शिवसेना व नंतर शिवसेना शिंदे गट असा प्रवास करणारे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना काही दिवसांपूर्वी शिवसेनेपेक्षा भाजपतर्फे निवडणूक लढवणे सोयीचे व सोपे असल्याचा साक्षात्कार झाला. त्याची प्रचीती गुढीपाडव्यानिमित्त आयोजित शोभायात्रेदरम्यान दिसून आली. इतर वेळी काही आप्तेष्टांच्या गोतावळय़ात असणाऱ्या खासदारांनी या शोभायात्रेत भाजपचे नगरसेवक पदाधिकारी यांच्याबरोबर राहण्याचे पसंत केले. खासदार गावित मागणी करतात म्हणून मुख्यमंत्री शिंदे पालघरची जागा भाजपसाठी सोडतात का, याची उत्सुकता असेल.
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही
एकेकाळी राज्याच्या सत्तेची सारी सूत्रे हाती असलेल्या राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. इंडिया आघाडीत मोठा भाऊ म्हणून मिरविणाऱ्या काँग्रेसची शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट या दोन्ही फुटीचा धक्का बसलेल्या पक्षांच्या नेत्यांनी पार जिरवली आहे. शिवसेना व राष्ट्रवादीने काँग्रेस नेत्यांना जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्यांमध्ये गुंतवून हवे ते करून घेतले आणि काँग्रेस नेत्यांना गाफील ठेवले. सांगली आणि भिवंडीतील उमेदवारांची घोषणा परस्पर शिवसेना आणि राष्ट्रवादीने केली तेव्हा जागावाटप पूर्ण झालेले नाही, अशी सारवासारव काँग्रेस नेत्यांनी केली. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा करण्यासाठी शिवसेनेच्या शिवालय कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगलीच्या जागेवर प्रसंगी टोकाची भूमिका घेण्याची भाषा करणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने मनाचा मोठेपणा दाखविला ही सांगण्याची नामुष्की आली. या वेळी पटोले यांच्या चेहऱ्यावरील भाव बोलके होते. शिवसेनेने २१ तर राष्ट्रवादीने १० जागा स्वत:कडे घेतल्या. काँग्रेसचा नाईलाज झाला. जागावाटपात नमते घेण्यावरून राज्यातील काँग्रेस नेते दिल्लीतील नेत्यांना खासगीत दोष देत आहेत पण त्यावर उघडपणे बोलताही येत नाही. एकूणच महाविकास आघाडीत काँग्रेस नेत्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे.
(संकलन : संतोष प्रधान, दयानंद लिपारे, नीरज राऊत, दिगंबर शिंदे.)