रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक गड मानला जात असला तरी दीड वर्षांपूर्वी झालेल्या फुटीनंतर शिवसेनेचे दोन्ही गट दावा करत आहेत. पण त्यांना बाजूला ढकलून महायुतीतील ‘दादा’ भाजपने या ठिकाणी अशा प्रकारे वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे की, दोन्ही शिवसेनांपेक्षा भाजपच इथे वरचढ वाटावा! गेल्या तीन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, मंत्री रवींद्र चव्हाण आणि गोव्याहून खास रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत या तीन वेळा नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचे मिळावे घेतले. तिन्ही नेत्यांनी, या मतदारसंघांवर भाजपचाच अधिकार असल्याचं ठासून सांगितलं. पण, ही जागा भाजप खरंच लढवणार आहे का, या मूळ प्रश्नाला तिघांनीही बगल दिली. दुसरीकडे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण ऊर्फ भय्या सामंत यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्वीच व्यक्त केली असताना कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा दबाव भाजपकडून टाकला जात आहे. मात्र या प्रस्तावाला सामंत फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीची अवस्था, ‘मंडप सजलाय, पण नवरदेवाचाच पत्ता नाही,’ अशी झाली आहे.
राजू शेट्टींची भेट अन् ..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यापासून ते कोणाबरोबर निवडणूक लढणार याचीच उत्सुकता आहे. शेट्टी यांनी महाविकास आघाडीबरोबर यावे म्हणून अजूनही प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शेट्टी यांची भेट घेऊन महाविकास आघाडीतून लढणे कसे फायद्याचे आहे, हे पटूवन देण्याचा सुमारे तासभर प्रयत्न केला. तत्पूर्वी, शेट्टी यांनी इंडिया आघाडीत सहभागी व्हावे म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा दूत कोल्हापूरमध्ये शेट्टी यांच्या भेटीसाठी आला होता. पुढे झाले असे की, शेट्टी यांनी बरोबर यावे म्हणून आवतण देणारे नितीशकुमार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाले. दुसरे नेते अशोक चव्हाण यांनीसु्द्धा भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. महाविकास आघाडीबरोबर यावे म्हणून शेट्टी यांच्या भेटीसाठी येणारे नेतेच भाजपबरोबर जाऊ लागल्याने आता शेट्टी यांच्या भेटीसाठी कोण कोण येते व त्या नेत्यांवरच आघाडीच्या नेत्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे.
शिंदे बंधूंची कोंडी
माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी एकीकडे सत्ताधारी भाजपमध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील संघर्ष पेटला असतानाच याच मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे भाजपपेक्षा माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू, करमाळय़ाचे आमदार संजय शिंदे यांची गोची झाली आहे. शिंदे बंधू मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. केवळ मोहिते-पाटील विरोधाचा भाग म्हणून खासदार निंबाळकर यांना शिंदे बंधू मदत करतात. परंतु आता अचानकपणे त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या फलटण-माण-खाटाव भागातील नेत्यांनी माढा मतदारसंघावर दावा केल्याने शिंदे बंधूची कोंडी झाली आहे.
मौनामागचा अर्थ काय ?
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज हे उमेदवार असतील असे निश्चित मानले जात आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज यांनी निवडणूक लढवू नये अशा आशयाचे विधान केले होते. त्यानंतर एका फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने दोघे समोरासमोर आले. शाहू महाराज यांनी मुश्रीफ यांना उद्देशून तुम्ही, काय म्हणाला होतात; हे वृत्तपत्रात वाचले, अशी गुगली टाकली. एरवी कोणताही प्रश्न, टीका झाली की त्यावर चपलख, मिश्किल, मार्मिक टिपणी करणारे नेते म्हणून मुश्रीफ ओळखले जातात. मात्र, महाराजांच्या या फिरकीवर क्रिकेटच्या मैदानात उत्तम फलंदाज म्हणून महाविद्यालयीन काळ गाजवलेल्या मुश्रीफ यांना चेंडू कसा टोलवावा हेच समजले नाही. त्यांनी हातात हात घेऊन हसत उत्तर देण्याचे टाळले. त्यांच्या या मौनाचा अर्थ काय, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे.
(संकलन : संतोष प्रधान, सतीश कामत, दयानंद लिपारे, एजाज हुसेन मुजावर)