सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर आणि त्यांनी निवडून आणलेले आमदार यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सक्रिय आहेत. परंतु यास तालुक्यातील नरखेड गावचे असलेले पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यात अनेक दिवसांपासून कमालीचा संघर्ष पाहायला मिळतो. हा संघर्ष कधी राष्ट्रवादी एकसंघ असताना शरद पवार यांच्यासमोर तर कधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर उजेडात आला होता. पवार काका-पुतण्यांकडून आतापर्यंत हा संघर्ष मिटविण्याच्या दृष्टीने कधीही हस्तक्षेप झाला नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने मोहोळ तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय राजन पाटील यांच्या अनगर गावात मंजूर झाले आहे. त्यास सर्वपक्षीय नेतेमंडळींचा प्रखर विरोध असून त्यातून उमेश पाटील यांच्याच पुढाकाराने वेळोवेळी आंदोलने झाली आहेत. अजित पवार यांच्या मोहोळमधील जनसन्मान यात्रेच्या वेळी अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात ‘मोहोळ बंद’ पाळण्यात आला. त्याचवेळी अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याची आवई उठवण्यात आली होती. अखेर त्याची गंभीर दखल घेत, आपला दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, या शब्दात अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. अर्थात त्यांचा रोख उमेश पाटील यांच्याकडेच होता. त्यांनी राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आपली ताकद कायम राहणार असल्याचा निर्वाळा ही दिला. पण दोन नेत्यांमधील वाद मिटविण्यासाठी अजित पवार पुढाकार घेणार का, हा मूळ प्रश्न तसाच कायम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा