शंभराव्या नाट्य संमेलननिमित्त अहिल्यानगरमध्ये विभागीय नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले. त्याचे उद्घाटन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त तथा उद्याोगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभात विभागीय नाट्य संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगताप यांनी मंत्री उदय सामंत यांच्या भूमिका नेहमीच चर्चेत असतात, असा उल्लेख करत ते गुवाहाटीला गेले, कामाख्या देवीचे दर्शन घेतले, आता दावोसला जाऊन आले, प्रत्येक वेळी त्यांची चर्चा झाली, असे संदर्भ दिले. त्याची परतफेड करताना मंत्री उदय सामंत यांनी आमदार जगताप यांच्या भूमिकेलाही टोला लगावला. सामंत म्हणाले, कुस्तीचे क्षेत्रात असलेला राजकारणी नेहमीच यशस्वी होतो, हे आमदार संग्राम जगताप यांनी दाखवून दिले आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आम्ही दोघेही पटाईत आहोत. मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नसता तर उद्याोगमंत्री झालोच नसतो. जगतापही योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, अशीही अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. त्यावर जगताप कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्र्यांनीच कान झाकले…
पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आलेल्या पर्यावरणमंत्री शंभूराज देसाई यांचे अनेकांनी स्वागत केले. सातारा शहरातही त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागताची मोठी तयारी केली. यासाठी शिवतीर्थ पोवई नाक्यावर मोठ्या फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव, आवाजाच्या भिंतीचा (डीजे) दणदणाट करून स्वागताचे जंगी आयोजन केले होते. पालकमंत्रीच येणार म्हटल्यावर दणदणाटाकडे पोलिसांनीही कानाडोळा केला. सगळीकडचे उत्साहात जल्लोषी स्वागत स्वीकारून पालकमंत्री देसाई साताऱ्यात गाडीतून उतरताच डीजेच्या आवाजाने पालकमंत्र्यांच्या कानठळ्या बसल्या. त्यांनी ताबडतोब आवाज कमी करण्याचे फर्मान सोडले.
(संकलन : विश्वास पवार, मोहनीराज लहाडे)