लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाने इतका धसका घेतला की, राज्याच्या तिजोरीतून लाडक्या बहिणीसह विविध घटकांसाठी योजनांचा एकच धडाका लावला आहे. सध्या या योजनांचा प्रचार आणि विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेतून करत आहेत. यात्रेची सुरुवात ज्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून झाली तिथे अजित पवार यांनी मात्र चांदीची खरीखुरी तलवार म्यानच ठेवली. मेळाव्यात एका पदाधिकाऱ्याने तलवार भेट देऊन त्यांचे स्वागत केले. तलवार सोपविल्यानंतर दादांनी ती म्यानातून बाहेर काढून व्यासपीठावरून दाखवावी, अशी पदाधिकाऱ्याची अपेक्षा होती. त्याने तशी विनंती केल्याचे दिसले. परंतु, दादांनी तलवार म्यानातून बाहेर काढलीच नाही. म्यानासह तलवार उंचावून दाखवत दादांनी क्षणार्धात ती सुरक्षारक्षकाकडे दिली. अजितदादांनी तलवार म्यान का ठेवली, हा प्रश्न उपस्थितांना पडला. पण दादांना प्रश्न करणार कोण ?
बाळसं धरलं …
काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीत नांदेड, लातूर आणि जालना मतदारसंघात यश आले आणि काँग्रेसला बाळसं आलं. ते दिसून आलं ते विभागीय बैठकीत. छत्रपती संभाजीनगर शहरात तशी काँग्रेस दुबळीच. कुपोषित म्हणता येईल एवढी. पण जालन्यातून कल्याण काळे निवडून आले आणि जालन्यातील काँग्रेसची नेते मंडळी जराशी पुढे सरसावली. संभाजीनगरच्या बैठकीत मग नेत्यांसाठी हार आणले गेले. तो फोटो काढण्यासाठी उचलता येईना एवढा मोठा होता. मग नेत्यांनीच तो फोटापुरता उचलून धरला. याच बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी मिरवणुका काढल्या. ढोल- ताशे वाजवले. उमेदवारी मिळावी म्हणून पोस्टर छापले. शहरभर फलक लावले. संभाजीनगरात हात दिसू लागला तेव्हा येता-जाता लोक म्हणाले, काँग्रेसने जरा बाळसं धरलं!
हेही वाचा >>>लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी?
आटपाट नगरीतील अशीही आमदारकी
जिल्ह्यातील आटपाट मतदारसंघ. आता मतदारसंघात निवडणुकीचे वेध लागले आहेत. यामुळे कुणाला आटपाट नगरावरची सत्ता मिळवायची आहे तर कुणाला आहे ते संस्थान कायम ठेवायचे आहे. यासाठी सढळ हाताने नगरवासीयांना देणग्यांचा रतीब घालायचा असतो. ही लोकशाहीत अघोषित परंपरा. यात जो कुणी हात अखडता धरेल त्याचे मतदानाच्या रणभूमीवर काही खरे नसते. एका गावात समाजाची भली मोठी गर्दी जमविण्यासाठी आर्थिक तरतूद तर आलीच. यावेळी मदत मागायला आलेल्या कार्यकर्त्याला जर तू काय आता ‘मुख्यमंत्री’ होणार का, असा सवाल जर दात्याने विचारला तर कार्यकर्त्याचा पाणउतारा आणि तेही समाजासमोर होणारच यात शंका नाही. मात्र आटपाट नगरात चार भिंतीआड झालेला संवाद ज्यावेळी खुल्या मैदानात उघड होतो, त्यावेळी आटपाट नगरीचा प्रस्थापित अस्वस्थ होणार हे स्वाभाविकच आहे. यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाल्याने आटपाट नगरातील समाजमाध्यमावर आता तू कसा आमदार होतो याचे संदेश फिरत आहेत.
(संकलन : सुहास सरदेशमुख, अनिकेत साठे, दिगंबर शिंदे)