मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा सुरू आहे. विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून इच्छुक या योजनेसाठी महिलांचे अर्ज दाखल करण्यासाठी पुढे आहेत. महिलांसाठी रेशन कार्ड, आधार कार्ड अद्यायावत करण्यापासून अर्ज दाखल करण्यापर्यंत संभाव्य आमदारांचे कार्यकर्ते रोखीने राबत आहेत. रोखीने अशासाठी की संध्याकाळी पगार मिळाला तरच दुसऱ्या दिवशी दुकान चालू, अन्यथा दुसरा इच्छुक आहेच. दुसऱ्या बाजूला यानिमित्ताने महिला मतदारापर्यंत पोहोचण्याची संधी साधण्याचा प्रयत्नही केला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी गावोगावी इच्छुकांच्या छबीसह मोटारी फिरत आहेत. यावर लावण्यात आलेल्या फलकावरून महायुतीमध्येच बेबनाव असल्याचे दिसून आले. गाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर इच्छुक उमेदवाराची छबी झळकत होती. मात्र, ज्यांनी या योजनेची घोषणा केली त्या उपमुख्यमंत्री अजितदादांची छबी नाही. कारण काय तर उमेदवारीच्या लढाईत पहिला सामना राष्ट्रवादीशीच. दादा आमच्या व जनतेच्या हृदयात असल्याने वेगळी छबी कशासाठी, असा सवाल करत शंकासुराला निरुत्तर केलं.
आमदार दोन अन् भावी मुख्यमंत्री म्हणे...
आगामी विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजायला सुरुवात होण्यापूर्वीच अनेकांना आमदार झाल्यासारखं वाटू लागलंय. आमदारकीचे दिवसा स्वप्न पाहणाऱ्या मंडळींचे तेवढेच अतिउत्साही अनुयायी यांनी आपला नेता आमदार व्हावा म्हणून देवादिकांचा धावा सुरू केला आहे. त्याही पुढे सरसावून काही कार्यकर्त्यांनी आपला नेता मुख्यमंत्री व्हावा म्हणून प्रसिद्ध मंदिरे, दर्गाहमध्ये साकडे घालायला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या सोलापुरातील काही कार्यकर्त्यांनी अजमेरला जाऊन ख्वाजा गरीब नवाज दर्गाहमध्ये फुलांची चादर अर्पण केली आहे. याही पलीकडे जाऊन प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू हे भावी मुख्यमंत्री असल्याची द्वाही त्यांच्या अनुयायांनी सोलापुरात डिजिटल फलकांच्या माध्यमातून फिरविली आहे. बच्चू कडू यांना मिळून त्यांच्या पक्षाचे अवघे दोनच आमदार असताना ते मुख्यमंत्री झाल्याचे स्वप्न त्यांच्या अनुयायांनी पाहणे, हा सोलापुरात चर्चेचा आणि तेवढ्याच करमणुकीचा विषय झाला आहे.
हेही वाचा >>>काकांचा पत्ता कापून अखिलेश यादवांनी ब्राम्हण नेत्याला दिले विरोधी पक्षनेतेपद; कोण आहेत माता प्रसाद पांडे?
…अरे आता थांबवा!
विधानसभा निवडणूक जवळ येत चालली तशी बहुसंख्य राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री कोण हे जवळपास ठरवून टाकले आहे. तसे शुभेच्छा फलक ठिकठिकाणी लागले जात आहेत. नगरमध्ये काँग्रेसचा महासंकल्प मेळावा झाला. त्यामध्येही माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावले गेले. मात्र यानिमित्ताने कार्यकर्ते आणखी एक संधी साधू लागले आहेत, ती म्हणजे भावी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणारे फलक झळकवताना भावी आमदार म्हणून स्वत:लाच शुभेच्छा देऊ लागले आहेत. काँग्रेसच्या मेळाव्यात जेव्हा प्रत्येक वक्ता थोरात यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करू लागला तेव्हा मात्र त्यांनी पदाधिकाऱ्यांना अडवले. तरीही नंतर काही जणांनी ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा उल्लेख करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र थोरातांवर ‘अरे आता थांबवा’ म्हणायची वेळ आली. कारण ‘भावी मुख्यमंत्री’ किंवा ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा वारंवार उल्लेख होऊ लागल्यावर हितशत्रू अधिक तयार होतात याचा चांगलाच अनुभव बाळासाहेबांना आहे.
हेही वाचा >>>कोण असेल प्रशांत किशोर यांच्या नव्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष; राजद, जेडीयू नि भाजपाला या पक्षाविषयी काय वाटतं?
कसेही या, पण विकास करा
लोकसभा निवडणुकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांना जावळी तालुक्यात एका कार्यक्रमासाठी बोलावले होते. परंतु दिल्लीला जाणे असल्यामुळे ते आले नाहीत. या कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. हाच धागा पकडत जावळीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी या भागात तुमचे वर्चस्व, प्रभाव आणि नेतृत्व आहे. तुमच्या विनंतीला मान देऊन मोठ्या महाराजांना निवडून आणलं. त्यामुळे खासदार फंडातून जावळी तालुक्याचा कायापालट झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.