मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा सुरू आहे. विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून इच्छुक या योजनेसाठी महिलांचे अर्ज दाखल करण्यासाठी पुढे आहेत. महिलांसाठी रेशन कार्ड, आधार कार्ड अद्यायावत करण्यापासून अर्ज दाखल करण्यापर्यंत संभाव्य आमदारांचे कार्यकर्ते रोखीने राबत आहेत. रोखीने अशासाठी की संध्याकाळी पगार मिळाला तरच दुसऱ्या दिवशी दुकान चालू, अन्यथा दुसरा इच्छुक आहेच. दुसऱ्या बाजूला यानिमित्ताने महिला मतदारापर्यंत पोहोचण्याची संधी साधण्याचा प्रयत्नही केला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी गावोगावी इच्छुकांच्या छबीसह मोटारी फिरत आहेत. यावर लावण्यात आलेल्या फलकावरून महायुतीमध्येच बेबनाव असल्याचे दिसून आले. गाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर इच्छुक उमेदवाराची छबी झळकत होती. मात्र, ज्यांनी या योजनेची घोषणा केली त्या उपमुख्यमंत्री अजितदादांची छबी नाही. कारण काय तर उमेदवारीच्या लढाईत पहिला सामना राष्ट्रवादीशीच. दादा आमच्या व जनतेच्या हृदयात असल्याने वेगळी छबी कशासाठी, असा सवाल करत शंकासुराला निरुत्तर केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा