माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने पुन्हा संधी दिल्यामुळे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांची वाढलेली नाराजी, राग आणि संताप तसेच प्रसंगी बंड करण्याची मानसिकता पाहता भाजपची डोकेदुखी वाढली आहे. यातच महायुतीत महत्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटही भाजपच्या अंतर्गत वादात ओढला गेला आहे. शिंदे गट दुंभगून एक गट खासदार निंबाळकर यांच्या बाजूने तर दुसरा गट मोहिते-पाटील यांच्या बाजूने उभा असल्याचे दिसते. माढा विभाग शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी तर खासदार निंबाळकर यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर करीत थेट पक्षालाच  जय महाराष्ट्र  केला आहे. याच शह-काटशहाच्या राजकारणात करमाळा तालुक्यातील शेलगाव-भाळवणीच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे शासननियुक्त अशासकीय प्रशासकीय मंडळ बरखास्त होऊन नवीन अशासकीय प्रशासकीय मंडळ अस्तित्वात आले. नवीन अशासकीय मंडळात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दूर करून भाजपच्या नेत्यांना संधी देण्यात आली. माढय़ातील भाजपअंतर्गत पेटलेल्या वादाची झळ शिवसेनेला बसू लागल्याचे हे उदाहरण मानले जात असताना या धक्कातंत्राचे सूत्रधार म्हणून भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेदवारीचा पत्ता नाही तरीही ‘भावी खासदार’!

राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार विनायक राऊत यांना हॅटट्रीकची संधी देण्यात आली असली तरी सत्ताधारी महायुतीच्या आघाडीवर अजून रस्सीखेच चालू आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या जागेवर हक्क सांगितला आहे, पण राज्यातील सत्तेत थोरला भाऊ असलेल्या भाजपने इथे आपलाच उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. तरीसुद्धा येथे महायुतीकडून उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं नाव छापलेले टी शर्ट तयार करून घेतले आहेत आणि अजून उमेदवारी अधिकृतपणे घोषित झालेली नसली ‘भावी खासदार किरण सामंतछ असं छापलेलं आहे.

मंत्र्यांचे काही खरे नाही

सांगली मतदारसंघातील उमेदवारीसाठी महायुतीतील भाजपमध्येच चढाओढ सुरू होती. मात्र, पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत खासदार संजयकाका पाटील यांचे नाव अंतिम होताच, ही चर्चाही विरली. महाआघाडीत अद्याप ठाकरे शिवसेना की काँग्रेस हा उमेदवारीचा संघर्ष सुरू असतानाच सोलापूरच्या जागेसाठी भाजपा मधून अचानकपणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. सोलापूरची जागा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असल्याने पक्षाकडून उमेदवारीसाठी शोध मोहिम सुरू असताना खाडे यांचे नाव समोर आले. मात्र आपण उमेदवारीसाठी राजी नसल्याचे सांगत असतानाच त्यांनी जर दिल्लीश्वरांचा आदेशच आला तरच सोलापूरची जागा लढवू असे सांगत ना नकार ना होकार अशीच सावध भूमिका घेतली. मुनगंटीवार यांची इच्छा नसताना त्यांना लोकसभा लढविणे भाग पडले. भाजपच्या मंत्र्यांचे काही खरे नाही हेच एकूण चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांना गणेशदादांबद्दल जिव्हाळा?

नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि भाजपने नेते गणेश नाईक यांच्यात विस्तवही जात नाही. येथील महापालिकेवर नाईकांची मागील तीन दशकांपासून सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि नाईकांच्या या सत्तेला पहिला धक्का बसला. महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास आणि आता थेट मुख्यमंत्री पद असल्याने गेल्या चार वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेचा कारभार पुर्णपणे शिंदे केंद्रीत आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या गणेश नाईकांनी मध्यंतरी ‘नवी मुंबईचे कारभारी ठरविणारे तुम्ही कोण’ अशा शब्दात थेट नगरविकास विभागालाच आवाज दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री आणि नाईक यांच्यातील विसंवादाची चर्चा सतत सुरु असताना महापालिकेच्या विकास कामांच्या भूमीपुजन सोहळय़ानिमीत्ताने एकत्र आलेल्या या दोन नेत्यांमध्ये मात्र निराळेच चित्र पहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अनेकवेळा नाईकांचा आदराने उल्लेख केलाच शिवाय महापालिकेमार्फत केला जाणारा प्रातिनिधीक सत्कारही त्यांनी नाईकांच्या हस्तेच स्विकारला. मुख्यमंत्र्यांनी नाईकांप्रती दाखविलेल्या आदराभावाचे मात्र वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chawadi maharashtra politics news on maharashtra politics maharashtra political crisis amy
Show comments