जरांगे पाटील रात्रभर मराठा, मुस्लीम आणि दलित मतांच्या बेरजा- वजाबाक्या ऐकत होते. फोन यायचा ते आतमध्ये जायचे. मग पुन्हा बाहेर यायचे. दोन दिवसांपासून उमेदवार उभे करणार म्हणून उमेदवारी न मिळणारे सारे जण आंतरवलीमध्ये मुक्कामी. कोणी गाडीत डुलकी मारली तर कोणी ऐकत बसले सारी चर्चा. सोमवारी सकाळी उमेदवार जाहीर करायचे नाहीत असे ठरले तेव्हा बंडखोर आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक म्हणाले… नुसतंच जागरण झालं हो. आता पाटील, पाटील अशा घोषणा देऊ आणि ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देऊ!
गाजराची पुंगी वाजवायची की खायची?
मिरज शहर चाळीस वर्षांपूर्वी टांग्यासाठी प्रसिद्ध होते. वॉन्लेस हॉस्पिटल, दत्त मैदान, किसान चौक आणि रेल्वे स्टेशन या ठिकाणी टांगा थांबे होते. रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना टांग्यातून प्रवास करावा लागत होता. प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा आल्यानंतर टांगा रस्त्यावरून गायबच झाला आहे. तरीही त्यावेळी टांगामालक घोड्यापुढे गवताची पेंढी बांधून टांगा पळवत होते. घोडा मात्र गवताच्या आशेने धावत असायचा. तशीच अवस्था निवडणुकीत इच्छुकांची झाली आहे. लोकसभेवेळी उमेदवारीच्या आशेने इच्छुक पळपळ पळाले. आता मात्र लक्षात आले आहे की, ते उमेदवारीचे गाजर होते. आता गाजराची पुंगी वाजवायची की खायची याचा विचार करून डोके खाजवयाची वेळ आली आहे.
हेही वाचा >>>Akola West constituency : विदर्भात वंचितची नामुष्की! मध्य नागपूरनंतर आता अकोला पश्चिममध्ये उमेदवारी माघार
शरद पवारांच्या सभेशिवाय पाऊस थांबणार नाही !
साताऱ्यातील अनेक तालुक्यांत ऐन दिवाळीत पाऊस झाला. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यावेळी कायम दुष्काळी असणाऱ्या माण खटाव आणि फलटण तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वैतागला असून पाऊस थांबण्याची वाट पाहत आहे. एका शेतकऱ्याने दुसऱ्याला विचारले की पाऊस थांबणार कधी. सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. गेल्या निवडणुकीत साताऱ्यात शरद पवार पावसात भिजत घेतलेली सभा चांगलीच गाजली होती. आता परत त्यांची सभा होत नाही तोपर्यंत पाऊस काही थांबणार नाही. त्याला मिळालेल्या उत्तराने तोही चक्रवाला आहे. असे उत्तर त्याला मिळाल्याने आता पाऊस थांबण्यासाठी शरद पवारांच्या सभेची वाट पाहावी लागणार आहे.
(संकलन : सुहास सरदेशमुख, विश्वास पवार, दिगंबर शिंदे)