Praniti Shinde in Solapur Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पूर्वीच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघाकडे आतापासूनच सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
काँग्रेसमधून १८ जण आमदारकीसाठी इच्छूक असताना माकपचे नेते नरसय्या आडम यांनी ही जागा स्वत:साठी मागितली आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुकांनी परस्पर दावेदारी असताना मुस्लीम आणि मोची समाजातूनही प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असल्यामुळे ही जागा राखताना काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटानेही या जागेवर दावा करून त्या अनुषंगाने हालचाली वाढविल्यामुळे भाजपलाही जागा सोडवून घेताना आटापिटा करावा लागणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींकडून या जागेवर परस्परविरोधी दावे-प्रतिदावे होत आहेत.
२००९ पासून सलग तीन वेळा या मतदारसंघाने खासदार प्रणिती शिंदे यांचे नेतृत्व फुलविले आहे. अलीकडे ‘एआयएमआयएम’ पक्षाने गेल्या दहा वर्षांत मुस्लीम मतपेढी मजबूत करून पाय रोवले आहेत. त्यामुळे तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना महायुतीपेक्षा ‘एमआयएम’शीच कडवा मुकाबला करावा लागायचा. किंबहुना ‘एमआयएम’ने मागील २०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा लढतीत काँग्रेसला अक्षरश: झुंजविले आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे गेली असता सेनेची मर्यादित ताकत पाहता ‘एमआयएम’चा धोका ओळखून संघ परिवारासह हिंदुत्ववादी मतांचे माप काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पारड्यात टाकले जात होते. अलीकडे मोदी झंझावातामध्येही हीच स्थिती दिसत होती. सध्या या मतदारसंघात एकूण तीन लाख ३० हजार २६० मतदारांची प्रारूप संख्या आहे.
हेही वाचा >>>Badlapur : बदलापूरमधली लैंगिक अत्याचाराची घटना आणि महाराष्ट्रात उठलेलं राजकीय वादळ
या पार्श्वभूमीवर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपवर मात करून खासदार झालेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना त्यांच्या हक्काच्या याच सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रात अवघ्या ७९६ मतांची निसटती आघाडी मिळाली होती. म्हणजेच त्यांना भाजपने धार्मिक ध्रुवीकरणाच्या यशस्वी प्रयोगांती रोखण्यात यश मिळविले होते. लोकसभा हरली, तरी इकडे सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या जागेवर मिळविलेल्या उल्लेखनीय मतांच्या बळावर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातूनच ही विधानसभेची जागा स्वत: लढविण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे.
पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे दिवंगत धूर्त राजकारणी विष्णुपंत कोठे यांचे नातू देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेचा राजकीय प्रवास करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे पालकत्व खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घेतल्याचे म्हटले जाते. कोठे यांनी शहर मध्य विधानसभा लढविण्याच्या एकमेव हेतूने भाजपचा मार्ग पत्करला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले आमदार राम सातपुते यांना त्यांच्या माळशिरस विधानसभेची जागा राखणे आवाक्याबाहेरचे असल्यामुळे शहर मध्य जागेवर भाजपकडून त्यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून समोर येऊ शकते. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांनी स्वत:साठी या मतदारसंघात संपर्क वाढविल्याचे दिसून येते.
हेही वाचा >>>Assam Row: आसाममध्ये बदलापूरसारखा उद्रेक; अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणात मारवाडी समाज लक्ष्य
उमेदवारीसाठी वाढता दबाव
इकडे महाविकास आघाडीमध्ये माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन दिल्याच्या मोबदल्यात शहर मध्य विधानसभेच्या जागेवर हक्क सांगून प्रत्यक्ष निवडणूक प्रचारही सुरू केला आहे. तर दुसरीकडे मुस्लीम समाजातून उमेदवारीसाठी काँग्रेसवर दबाव वाढला आहे. मोची समाजानेही तशाच पद्धतीने दबाव आणला आहे. जोडीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची काही वजनदार मंडळी उमेदवारीसाठी घोड्यावर बसली आहेत. काँग्रेसने मुस्लीम उमेदवार उभा केल्यास त्या विरोधात भाजपला धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेऊन ही जागा काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेणे सुलभ जाणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.