Congress vs Shiv Sena in Bandra East Assembly Constituency : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना वांद्रे पूर्व येथून मिळालेल्या मताधिक्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील विजयाबद्दल मविआतील आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला आहे. दुसरीकडे, विद्यामान काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांच्याबाबतच्या राजकीय अनिश्चिततेमुळे या जागेबाबत गुंता निर्माण होणार आहे.
वांद्रे पूर्व मतदारसंघात मराठी आणि मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मविआसाठी सोपा मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले. या निकालाने मविआचा आत्मविश्वास वाढवला आहे. मात्र, प्रत्यक्ष लढतीआधी उमेदवारीसाठी मविआमध्ये चढाओढ लागणार आहे.
मागील तीन विधानसभा निवडणुकांचा विचार करता येथे तिन्ही वेळा येथून शिवसेनेचा (सध्याचा ठाकरे गट) उमेदवार रिंगणात उतरला आहे. २००९ आणि २०१४ मध्ये येथून शिवसेनेचे बाळा सावंत विजयी झाले होते. २०१९ मध्ये विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेकडून लढले होते. मात्र बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि याचा फटका महाडेश्वर यांना बसला. येथून काँग्रेसचे झिशान सिद्दिकी आमदार झाले. त्यामुळे आता ही जागा काँग्रेसच्या नावावर आहे. परिणामी मविआमध्ये वांद्रे पूर्वच्या जागेवरून काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष होऊ शकतो.
शिंदे गटाचे माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, महायुतीमधील जागावाटपाचे सूत्र ठरले ?
काँग्रेसचे सध्याचे उमेदवार झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी काँगेसचा हात सोडत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. झिशान सिद्दिकी हे अद्याप काँग्रेसमध्ये असले तरी, त्यांच्या पुढील राजकीय दिशेबाबत संभ्रम असल्याने काँग्रेसकडून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षातून जनार्दन चांदूरकर, सचिन सावंत आणि भाई जगताप हे या जागेसाठी इच्छुक असल्याचे समजते आहे. दरम्यान आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभे राहण्याचा इशारा नुकताच झिशान सिद्दिकी यांनी दिला आहे. ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून त्यानुसार सरदेसाई मतदारसंघात सक्रियही झाले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी पक्की असल्याने सरदेसाई यांना त्याचा फायदा होईल, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
महायुतीत अजित पवार गटाला उमेदवारी?
महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीत जागेसाठी तितकासा संघर्ष दिसण्याची शक्यता नाही. भाजप या जागेवर दावा करेल, मात्र अजित पवार गटालाही जागा जाण्याची अधिक शक्यता व्यक्त होत आहे. अजित पवार गटाचा उमेदवार कोण हा प्रश्न असणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असताना शिंदे गटाकडूनही काही जण उत्सुक असल्याचेही म्हटले जात आहे.