सुनील नवले
संगमनेर: Balasaheb Thorat vs Radhakrishna Vikhe Sangamner Assembly Constituency बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हे नगर जिल्ह्यातील नेतृत्व. एकाच पक्षात असताना आणि विरोधी पक्षांत असतानाही एकमेकांच्या राजकीय ‘बालेकिल्ल्यां’ना धक्का लागू न देण्याचे तत्त्व पाळत दोन्ही नेत्यांनी नगरचे राजकारण संतुलित ठेवले. मात्र, लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्याविरोधात थोरातांनी आपली ताकद लावल्यानंतर या ‘समझोत्या’ला धक्का बसला असून आता विखेही थोरात यांच्या संगमनेरमध्ये आपली शक्ती लावण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या मतदारसंघात यंदा चुरस रंगण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संगमनेर आणि थोरात हे नाते गेल्या चार दशकांपेक्षाही जुने आहे. १९८५ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर थोरात पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात सामील झाले आणि त्यानंतरच्या सर्व निवडणुका त्यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या. साखर कारखाना, दूध संघ यासह झाडून सगळ्या सहकारी संस्था, नगरपालिका थोरात यांच्या ताब्यात आहेत. या संस्थांच्या माध्यमातून संगमनेरचे अर्थकारण मजबूत झाले, कार्यकर्त्यांची भक्कम फळी त्यांनी उभी केली.

हेही वाचा >>>Shatrughan Sinha : “पंतप्रधान मोदी आता राहुल गांधींच्या…”, अनुराग ठाकूरांच्या ‘त्या’ विधानावरून शत्रुघ्न सिन्हा यांची टीका!

सन २०१९ च्या निवडणुकीत थोरात यांच्या विरोधात एकत्रित शिवसेनेने उद्याोजक साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली होती. नवले यांना ६३ हजार १२८ मते मिळाली, तर थोरात १ लाख २५ हजार ३८० मते घेऊन विजयी झाले. आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक ६४ टक्के मते थोरात यांना मिळाली होती. उत्तरोत्तर मताधिक्यामुळे थोरात यांचा गड अधिक मजबूत झाला. मात्र, आगामी निवडणुकीला मात्र मंत्री विखे आणि थोरात यांच्या बदललेल्या नव्या संघर्षाची किनार असणार आहे.

आजवरच्या निवडणुकीत विखे आणि थोरात यांनी एकमेकांच्या विधानसभा क्षेत्रात थेट लक्ष घातले नव्हते. या वेळच्या लोकसभा प्रचारादरम्यान दोघांनीही एकमेकांच्या विरोधात उमेदवार देण्याची, किंबहुना उमेदवार निश्चित केल्याची घोषणा केली होती. नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयात थोरात व त्यांच्या यंत्रणेचे मोठे योगदान राहिले आहे. त्यातून त्यांनी विखे यांना शह दिल्याचे मानले जाते. त्याची परतफेड विखे करतात का, हे पाहावे लागेल.

कन्येवर जबाबदारी

बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री या गेल्या काही वर्षांपासून सक्रिय झाल्या असून युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षही आहेत. त्यांनी युवकांची मोठी फळी उभी केली आहे. महिलांचे आरोग्य, रोजगार यासाठी त्यांचे काम सुरू आहे. घरच्या मैदानाची डॉ. जयश्री, माजी आमदार सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आदींवर जबाबदारी सोपवून थोरात राज्यस्तरावर लक्ष देतात. असे असले तरी, संगमनेरमधून थोरात हेच निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta karan rajkaran compition in sangamner due to political conflict between balasaheb thorat and radhakrishna vikhe print politics news amy