Prithviraj Chavan in Karad Dakshin Constituency : सातारा जिल्ह्यातील ‘कराड दक्षिण’ हा असा मतदारसंघ की ज्यामध्ये काँग्रेसचा कधी पराभवच झाला नाही. या अशा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपसोबत वाढलेल्या चुरशीचा यंदाही काँग्रेसला सामना करावा लागणार आहे. भाजपकडून कृष्णा उद्याोग समूहाचे नेते डॉ. अतुल भोसले यांची उमेदवारी निश्चित आहे. तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण की रयत संघटनेचे प्रबळ नेते अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यापैकी कोणाला काँग्रेसची उमेदवारी मिळणार, याबाबत अद्याप निश्चितता नाही. या दोघांतील स्पर्धेमुळे कराड दक्षिणमध्ये पक्षाच्या वर्चस्वाला यंदा झळ बसू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री यशवंतराव मोहिते व विलासकाका उंडाळकर यांनी नेतृत्वाची धुरा वाहिलेला ‘कराड दक्षिण’ अनेक वादळात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या झंझावातातही काँग्रेस विचाराशी एकनिष्ठ राहिला. विलासकाका तर, सलग सात वेळा निवडून आले. कराड व मलकापूर नगरपालिकेचा अपवाद वगळता जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्थांसह तालुक्यातील सर्वच प्रमुख संस्था आजही उंडाळकर गटाच्या ताब्यात आहेत. तर, मोहिते आणि उंडाळकर या उभय दिग्गज नेत्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्याची संधी मिळाली. या सत्तेतून त्यांनी काँग्रेस घराघरात रुजवल्याने ‘कराड दक्षिण म्हणजे काँग्रेस’ असे सूत्र बनून गेले.

हेही वाचा >>>Jammu Kashmir Election : भाजपात निष्ठावानांऐवजी आयारामांना संधी, ‘वापरा अन् फेकून द्या’ धोरण राबवल्याचा आरोप, विधानसभेची वाट खडतर

विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुकांत मात्र, भाजपने डॉ. अतुल भोसले यांच्या उमेदवारीवर कराड दक्षिणेत जोरदार मुकाबला केला. त्यात २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपकडून डॉ. अतुल भोसले आणि अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले विलासकाका उंडाळकर अशी तिरंगी लढत रंगली. त्या लढतीत चव्हाण यांचा विजय झाला. मात्र, अपक्ष लढूनही दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या विलासकाका यांची चर्चा अधिक झाली. तसेच तोवर कधीही दहा हजार मतांचा टप्पा न गाठलेल्या भाजपने ५८ हजारांहून अधिक मते घेतली. पुढे २०१९च्या निवडणुकीतही तिरंगी लढत झाली. मात्र, त्या वेळी विलासकाकांच्या जागी त्यांचे पुत्र उदयसिंह अपक्ष उभे राहिले. त्यातही चव्हाण यांनी ४३.९० टक्के मतांसह बाजी मारली. मात्र, डॉ. अतुल भोसले यांनीही ८३ हजारांहून अधिक मते मिळवून दुसरे स्थान पटकावले. गेल्या दोन निवडणुकांत भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली असताना २०२४च्या निवडणुकीत पुन्हा तिहेरी स्पर्धा सुरू आहे.

चव्हाण व उंडाळकर गटातही आपल्याच नेतृत्वाला उमेदवारी मिळण्याचा दावा होत आहे. त्यामुळे संधी कोणाला मिळणार आणि डावलल्या जाणाऱ्या गटाकडून काय भूमिका घेतली जाणार, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.

हेही वाचा >>>K C Tyagi : जदयूच्या के. सी. त्यागींना स्पष्टवक्तेपणा भोवला? प्रवक्तेपदाची सोडचिठ्ठी एनडीएमुळे?

लोकसभेत चव्हाणांचा निर्धार निष्फळ

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस एकसंध आणि राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला असताना शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांची निराशा झाली आणि साताऱ्यातून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार निवडून जाऊ नये हा पृथ्वीराज चव्हाणांचा निर्धार निष्फळ ठरल्याची बाब निश्चित गंभीर आहे. इथे झालेली डॉ. भोसले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची कामगिरी विधानसभेसाठी जमेची बाजू आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta karan rajkaran double challenge anil deshmukh karad south constituency assembly election 2024 in satara district print politics news amy