जळगाव : शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटातील मोठ्या नेत्यांमध्ये ओळखले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून लढणार हे जवळपास निश्चित आहे. त्याचवेळी त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गुलाबराव देवकर यांचे आव्हान असेल, असेही ठामपणे सांगितले जात आहे. एरंडोलमधील दोन गुलाबरावांमध्ये ‘काट्या’ची लढत होणार असली तरी, गुलाबराव पाटील यांना भाजपची साथ किती मिळते, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.

विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातील गावे मिळून २००९ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघ तयार करण्यात आला. मागील तीनही निवडणुकांमध्ये मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. भाजपचा प्रभाव असणाऱ्या जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील हे १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्याकडून त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. देवकर यांना ७१ हजार ५५६ तर पाटील यांना ६६ हजार ९९४ मते मिळाली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती असतानाही भाजपचे नेते पी. सी. पाटील यांनी उघडपणे देवकर यांना साथ दिली होती.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय

हेही वाचा >>>“स्वातंत्र्यसैनिकांची जमीन मंत्री सत्तार यांनी बळकावली”, भाजपचे रावसाहेब दानवे यांचा आरोप

२०१४ मध्ये सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविल्याने शिवसेना-भाजपही समोरासमोर होते. या निवडणुकीवेळी देवकर हे जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असतानाही राष्ट्रवादीने त्यांनाच मैदानात उतरविले होते. पाटील यांनी ३१ हजारपेक्षा अधिक मतांनी देवकर यांचा पराभव करून मतदारसंघावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. या निवडणुकीनंतर युती सरकारमध्ये पाटील हे सहकार राज्यमंत्री झाले. २०१९ मध्ये युती असतानाही पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांनी आव्हान निर्माण केले. परंतु, बंड मोडून काढत पाटील यांनी ४६ हजार ७२९ मतांनी अत्तरदे यांचा पराभव केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पाटील यांचे जळगावमधील महत्त्व अधिकच वाढले. त्यात शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे झाले.

आगामी निवडणुकीत जळगाव ग्रामीणमध्ये शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील हेच उमेदवार राहणार हे निश्चित असून महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटासाठीच ही जागा सुटण्याची शक्यता असल्याने देवकर विरुद्ध पाटील ही दोन गुलाबरावांमधील पारंपरिक लढत पुन्हा पाहण्यास मिळेल. ठाकरे गटाकडून माजी उपमहापौर सुनील महाजन, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनीही तयारी सुरू केली आहे. मंत्री पाटील यांना रोखण्यासाठी देवकर हे काही दिवसांपासून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या समस्या मांडत आंदोलनांच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. एकमेकांवर वार-पलटवाराचे वाक्युद्धही रंगले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, मागील निवडणुकांतील अनुभव पाहता भाजपकडून पाटील यांना कितपत साथ मिळेल, यावरच त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.

हेही वाचा >>>करमाळ्यात पारंपारिक विरोधक बाजूला; मोहिते-शिवसेना शिंदे गटातच जुंपली

मंत्रीपद देणारा मतदारसंघ

२००९ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघ तयार झाल्यापासून विजयी झालेल्या आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्यात २००९ मध्ये राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांना राज्यमंत्रीपद, २०१४ मध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्रीपद, तर २०१९ मध्ये पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्रीपद मिळाले. त्यामुळे हा मतदारसंघ मंत्र्यांचा ठरला आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील हेच उमेदवार असतील हे निश्चित असून शरद पवार गटाला ही जागा मिळाल्यास गुलाबराव देवकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.