Ballarpur Assembly Election 2024 : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घसघशीत मताधिक्य मिळाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या मुनगंटीवार यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीतही मोठे आव्हान आहे. मताधिक्य मिळाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला असला तरी, आता येथून उमेदवारीसाठी पक्षातील वडेट्टीवार आणि धानोरकर हे दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. विधानसभेसाठी पक्षाकडे २२ इच्छुकांची यादी असून त्यातून एकाची निवड करताना काँग्रेसची दमछाक होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुधीर मुनगंटीवार हे इच्छुक नसतानाही भाजपने लोकसभा निवडणुकीत त्यांना प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात उमेदवारी दिली. उमेदवारी मिळाल्यानंतर मात्र मुनगंटीवार यांनी प्रचारात पूर्णपणे झोकून विजयासाठी प्रयत्न केले. परंतु मविआच्या एकत्रित पाठबळामुळे धानोरकर यांनी २ लाख ६० हजार मताधिक्य मिळवून विजय मिळवला. मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातच ते ४८ हजार मतांनी पिछाडीवर गेले. २००९ पासून मुनगंटीवार यांनी बल्लारपूरचे प्रतिनिधित्व केले. मात्र लोकसभा निवडणुकीत येथूनच त्यांना मताधिक्य न मिळवता आल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांची कसोटी लागणार हे निश्चित आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून संघर्ष होणार, हेही निश्चित आहे.

हेही वाचा >>>Himanta Biswa Sarma : भूमी व खत जिहादनंतर आता ‘पूर जिहाद’, आसामच्या मुख्यमंत्र्यांची मुसलमानांवर आगपाखड; गुवाहाटीतील पुरावरून…

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून आपल्याच गटाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही गटांत समन्वय घडवून आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून तिकीट वाटप करताना जिल्ह्यातील सहा मतदारसंघांचे समान वाटप केले जाण्याची शक्यता आहे. वरोरा हा धानोरकर यांचा हक्काचा मतदारसंघ आहे तर ब्रम्हपुरी व चिमूर या दोन मतदारसंघांवर वडेट्टीवारांचे वर्चस्व आहे. त्यामुळे चंद्रपूर व बल्लारपूर या दोनपैकी एका मतदारसंघातून आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी दोघेही प्रयत्नशील आहेत.

बल्लारपूरसाठी वडेट्टीवार गटाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत तर धानोरकर गटाकडून घनश्याम मुलचंदानी यांची नावे चर्चेत आहेत. मुलचंदानी यांनी यापूर्वी बल्लारपूरमधून निवडणूक लढली होती व त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यंदा वडेट्टीवार यांच्याकडून संतोष रावत यांच्यासाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी?

मित्रपक्षांतही इच्छुकांची रांग

बल्लारपूर मतदारसंघावर महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे) गटाने दावा केला आहे. जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे इच्छुक आहेत. त्यांनी कामदेखील सुरू केले आहे. बल्लारपूर मतदारसंघातून काँग्रेस सातत्याने पराभूत होत आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) कंबर कसली आहे. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्या यांनी राष्ट्रवादीला ही जागा सोडावी, अशी मागणी केली असून जागा काँग्रेसला सोडल्यास जिल्हाध्यक्षासह सर्व पदाधिकारी राजीनामे देतील, असा इशारा दिला आहे. ‘निर्भय बनो’कडून पर्यावरण कार्यकर्ता बंडू धोतरे यांचेही नाव पुढे केले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूरमध्येच काँग्रेसने मताधिक्य मिळवल्याने यंदा चुरस रंगणार आहे. मात्र, उमेदवार निवडताना काँग्रेसची दमछाक होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta karan rajkaran minister sudhir mungantiwar challenge for assembly elections 2024 from ballarpur assembly constituency print politics news amy