कल्याण : शिवसेना पक्षातील फुटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ब्रँड ठाकरे’ जपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत विशेषत: मनसेचे एकमेव आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिंदे-राज यांच्यातील मैत्रीची कसोटी लागणार आहे. स्थानिक स्तरावर मनसे विरुद्ध शिंदे गट असा कार्यकर्ता संघर्ष सुरू असताना, पक्षनेतृत्वाच्या पातळीवरील समझोता राजू पाटील यांना तारणार का हा प्रश्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत मुंबई महानगर पट्ट्यात आणि विशेषत: मुंबईत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राज ठाकरे यांचा तोफखाना महायुतीच्या पथ्यावर पडेल, अशी गणिते बांधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांनी राज यांना महायुतीच्या तंबूत आणले. राज ठाकरे यांनीही लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवता महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. या खेळीचा प्रत्यक्ष मतदानावर कितपत प्रभाव दिसला, याबाबत महायुतीच्या गोटात अजूनही चाचपणी सुरूच आहे. त्यातच मुंबई आणि ठाणे या पट्ट्यात मनसे आणि महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला संघर्षही महायुतीच्या नेत्यांसाठी चिंतेची बाब आहे.

हेही वाचा >>>“केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?

मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातही हा संघर्ष कळीचा मुद्दा ठरू शकतो. राजू पाटील हे एकेकाळी खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जात. खासदार शिंदे यांनी आखलेल्या प्रकल्पांबाबत राजू पाटील यांनी अनेकवेळा टीकाटिप्पणी केली आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा जरी आपल्या समोर असला तरी आपण लढायला तयार असतो आणि या मतदारसंघात विरोधकांचा चेहरा आपणच आहोत असे चित्र राजू पाटील यांनी गेल्या पाच वर्षात अगदी पद्धतशीरपणे तयार केले. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आणि शिंदे-राज यांच्यातील मैत्री घट्ट झाल्यापासून पाटील यांनी शिंदे यांच्याशी जुळवून घेतले आहे. लोकसभेत राज यांनी मोदी यांना पाठिंबा दिल्यापासून पाटील यांचा सूर बदलला. ‘राजगडा’वरून संदेश येताच राजू पाटील श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कामाला लागले. मुख्यमंत्र्यांनीही पाटील यांच्यासाठी भेटीगाठी घेतल्या.

निवडणुकीच्या निकालात या मतदारसंघात खासदार शिंदे यांना ८० हजाराचे मताधिक्य मिळाले. आगरी समाज खासदार शिंदे यांच्यावर नाराज आहे वगैरे गप्पा या मताधिक्याने खोट्या ठरविल्या. राजू पाटील यांनीही बऱ्यापैकी आपले काम केल्याचे श्रीकांत समर्थक नेत्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाचीही मोठी ताकद असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज आणि मुख्यमंत्र्यांचा जरी समझोता झाला तरी राजू पाटील यांना शिंदेसेनेचे स्थानिक ताकदवान नेते सहज मदत करतील हे शक्य नाही. मुळात खासदार शिंदे यांनाही राजू पाटील पुन्हा निवडून येणे हवे आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

हेही वाचा >>>राम मंदिर आणि मोदींवर भाजपाचा अतिविश्वास होता का? केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल काय म्हणाल्या?

शिवसेनामनसे संघर्ष जुना

कल्याण ग्रामीण मतदार संघात आतापर्यंत शिवसेना आणि मनसेत टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. २७ गाव आणि परिसरात राजू पाटील यांचे वर्चस्व खासदार शिंदे यांच्या समर्थकांना मान्य नाही. तसेच खासदार शिंदे यांनी ज्या वेगाने या संपूर्ण पट्ट्यात स्वत:चा प्रभाव वाढविला आहे ते पाहाता भविष्यकाळ आपल्यालाही सोपा नाही याची जाणीव आमदार पाटील यांना आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळेच माजी आमदार आणि सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले सुभाष भोईर यांना कल्याण ग्रामीणचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. शिंदे पुत्राची मर्जी कमी झाली आणि सुभाष भोईर यांची उमेदवारी ऐनवेळेस कापण्यात आली. कोपरच्या रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना त्यावेळच्या एकसंध शिवसेनेने दिलेली उमेदवारी ग्रामीणच्या मतदारांना मान्य झाली नाही. त्यावेळी झालेला पराभव हा सध्या शिंदेसेनेतील अनेकांच्या जिव्हारी लागला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta karan rajkaran mns mla pramod patil contest against shrikant shinde in the kalyan rural constituency in the assembly elections amy
Show comments