मुंबई : अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले. मात्र, गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत वायकर यांनी ज्या जोगेश्वरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, तेथे त्यांच्या जागी कोण, असा प्रश्न आता शिवसेना शिंदे गटापुढे उभा ठाकला आहे. त्यासाठीची शोधाशोध सुरू असली तरी, या मतदारसंघावर दावा करण्याची तयारी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र वायकर २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये असे तीनदा सलग जोगेश्वरीमधून आमदारकीला निवडून आले. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ते अडचणीत आले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर वायव्य मुंबई मतदारसंघातून शिंदे गटाने त्यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात असले तरी, त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून वायकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत फेरमोजणीच्या दोन फेऱ्यांनंतर वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. वायकर यांच्या रूपात शिंदे गटाचा मुंबईतून एकमेव खासदार लोकसभेत गेला असला तरी, वायकर आमदार असलेल्या जोगेश्वरीच्या विधानसभा जागेबाबत शिंदे गटापुढे पेच उभा ठाकला आहे.

हेही वाचा >>>दोन आठवड्यांत उत्तर सादर करा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ही जागा आपलीच असल्याचा शिंदे गटाचा दावा असला तरी, उमेदवाराबाबत त्यांच्याकडे कोणतीही स्पष्टता नाही. वायकर यांच्या पत्नी मनीषा यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, त्याखेरीज शिंदे गटातील अन्य कोणाचेही नाव या स्पर्धेत अद्याप पुढे आलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे, या जागेवर भाजपकडून दावा सांगण्यात येण्याची शक्यता अधिक आहे.

रवींद्र वायकर यांच्याविरोधात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच जोगेश्वरीतून वायकर यांना लोकसभा निवडणुकीत कमी मते मिळाली. भाजपकडून वायकरांसाठी येथे काम केले गेले नसल्याचेही म्हटले जात आहे. जोगेश्वरीतील महाकाली गुंफा, बांद्रेकरवाडी, कोकणनगर, श्याम नगर, मेघवाडी आदी ठिकाणच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. पुनर्विकास तात्काळ मार्गी लावण्याची स्थानिकांची मागणी असताना पुनर्विकास रखडला आहे. वाय़कर यांच्याकडून पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी कोणतीही ठोस पावले त्यांच्या कार्यकाळात उचलली गेली नसल्याचा आरोप भाजपकडूनच केला जात होता. याचाही फटका वायकरांना बसला आणि त्यामुळेच जोगेश्वरीतून त्यांना मताधिक्य मिळवता आले नसल्याचे म्हटले जात आहे. आता विधानसभेसाठी ही जागा आपल्याकडे घेण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.

विधानसभेची ही जागा शिंदे गटाकडे असली तरी, स्थानिक पातळीवर भाजपचे कार्यकर्ते येथील उमेदवारीसाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मविआतही चढाओढ

जोगेश्वरीच्या जागेबाबत महायुतीत मतैक्य नसताना महाविकास आघाडीतही अद्याप नावनिश्चिती झालेली नाही. ठाकरे गटाचे बाळ नर आणि विश्वनाथ सावंत हे या जागेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसचेही काही नेते जोगेश्वरीतून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. दोन्ही पक्षांकडून उमेदवारीवर दावा केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीनंतर जोगेश्वरीला नवीन आमदार मिळणार, हे मात्र नक्की आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta karan rajkaran shiv sena shinde group questions who will replace ravindra waikar from jogeshwari constituency for assembly elections print politics news amy