North East Mumbai Constituency : मुंबई : लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघाचा भाग असलेल्या विक्रोळीत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे विक्रोळीतील ठाकरे गटाचे विद्यामान आमदार सुनील राऊत यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीला आलेले मराठी विरुद्ध गुजराती हे स्वरूप हेदेखील पाटील यांच्या विजयाचे एक कारण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या फुटीनंतर निर्माण झालेल्या दोन गटांत येथे लढत झाल्यास भाषेचा मुद्दा मागे पडू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातील लढत चुरशीची बनली होती. सुरुवातीला भाजपचे मिहिर कोटेचा यांच्या बाजूने झुकलेल्या या मतदारसंघात प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या मराठी विरुद्ध गुजराती वादाने कलाटणी दिली. त्याचा मोठा फायदा ठाकरे गटाचे संजय पाटील यांना झाला. पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यात विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील मतदारांचाही मोठा वाटा होता. त्यामुळे विक्रोळीमध्ये पुन्हा ठाकरे गट सरशी साधेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, ठाकरे गटाचे सुनील राऊत यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचे आव्हान असू शकते.

हेही वाचा >>>भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रवक्त्यांची फौज

२००८ मध्ये झालेल्या मतदार संघाच्या पुनर्रचनेमध्ये विक्रोळी विधानसभा हा भांडुप विधानसभेतून वेगळा झाला. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर मनसेचे मंगेश सांगळे हे आमदार बनले. मात्र, २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. त्यातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे निवडून आले. २०१९च्या निवडणुकीतही राऊत यांनी हा मतदारसंघ राखला. मराठी मतांची साथ आणि पालिका प्रभाग स्तरावर शिवसेना नगरसेवकांचे प्राबल्य या दोन्हींमुळे राऊत दुसऱ्यांदा आमदार बनले.

सातत्य कायम ठेवण्याचे ठाकरे गटासमोर आव्हान

विक्रोळी मतदारसंघातील सहापैकी चार जागांवर शिवसेनेचे नगरसेवक होते तर, भाजप आणि राष्ट्रवादीचे येथे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विक्रोळीतही शिवसेनेचे दोन गट पडले. उपेंद्र सावंत, सुवर्णा करंजे आणि चंद्रावती मोरे या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता विधानसभेसाठी शिंदे गटातून सुवर्णा करंजे आणि विलास पारकर हे इच्छुक आहेत. भाजपमधूनही विक्रोळी मतदारसंघातून माजी नगरसेवक मंगेश पवार तसेच माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे भाजप किंवा शिंदे गटाकडून मराठी उमेदवार रिंगणार उतरणार असल्यामुळे मराठी मतांचे थेट विभाजन होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याचे सातत्य कायम ठेवण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta karan rajkaran shiv sena two factions contest for the vikhroli assembly election of northeast mumbai constituency print politics news amy
Show comments