ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शिवसेना शिंदेगट आणि भाजपच्या वर्चस्वाला सातत्याने आव्हान देणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा विधानसभेत कोणाला उमेदवारी द्यायची, हा प्रश्न महायुतीसाठी आव्हानात्मक ठरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आव्हाड यांच्या विरोधकांना एकत्र आणूनही महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना ६५ हजारांची पिछाडी मिळाली. त्यामुळे आव्हाडांचा बालेकिल्ला कसा भेदायचा याचे मोठे आव्हान शिंदेसेनेपुढे असणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख १५ हजार ४८४ मतदान झाले. यापैकी मुस्लिमबहुल मुंब्रा भागात महाविकास आघाडीला एक लाख एक हजार ४४४ इतके तर डॉ.श्रीकांत शिंदे यांना जेमतेम १४ हजार ६४ मते मिळाली. मुस्लिमांचा भरणा असलेल्या मुंब्य्रात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळणार हे निश्चित होते. त्यामुळे आव्हाडांच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिंदेसेनेने या भागातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना आपल्या तंबूत आणले होते. आव्हाडांचे एकेकाळचे शिष्य आणि त्यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजाविलेले नजीब मुल्ला यांच्याकडे यावेळी डॉ. शिंदे यांच्या प्रचाराची धुरा होती. मुल्ला हेच विधानसभेत आव्हाड यांच्याविरोधात उभे रहातील असे चित्र रंगविण्यात आले होते. राजन किणे यांच्यासह आव्हाडांच्या गोटातील निम्म्याहून अधिक नेत्यांना महायुतीच्या तंबूत आणण्यात आले होते.
हेही वाचा >>>दानवेंच्या पराभवामुळे भाजपने आखलेल्या योजना अडचणीत ?
त्यानंतरही मुंब्य्रात मिळालेले ८६ हजारांचे मताधिक्य आगामी विधानसभेसाठी महायुतीची चिंता वाढविणारे ठरले आहे. मुंब्य्रात इतके मोठे मताधिक्य मिळत असताना हिंदुबहुल कळव्यातही श्रीकांत यांना अपेक्षित मताधिक्य मिळालेले नाही.
त्यामुळे आता आव्हाडांविरोधात कुणाला रिंगणात उतरवयाचे याचा खल सध्या महायुतीत सुरू आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा सांगितला असून नजीब मुल्ला यांचे नाव तेथून चर्चेत आहे. मुल्ला यांना रिंगणात उतरवून मुंब्य्रातील मुस्लीम मतांचे विभाजन घडवून आणण्याचा आणि कळव्यातील संघटनात्मक ताकद त्यांच्यामागे उभी करायची, असा एक पर्याय शिंदेसेनेपुढे आहे. मुल्ला यांच्याशिवाय राजन किणे या कट्टर आव्हाड विरोधकाला पुन्हा एकदा विधानसभेची संधी देण्याची खेळी शिंदे यांच्याकडून खेळली जाऊ शकते. किणे यांचे मुंब्य्रात चांगले प्रस्थ असून ते याच भागातून सलग पाच वेळा नगरसेवक राहीले आहेत.आव्हाड विरोधकांना एकत्र आणूनही त्यांचा बालेकिल्ला भेदण्यात अपयश आल्याने शिंदेगटासमोर पेच उभा ठाकला आहे.
हेही वाचा >>>केवळ चाईल्ड पॉर्नोग्राफी पाहणं हा गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय
मैत्री ते कोंडी
ठाण्यातील राजकारणात एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी या दोघांमधील मैत्री लपून राहिलेली नाही. या दोन्ही नेत्यांनी नेहमीच एकमेकांना सांभाळून घेतल्याची चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात होते. शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री असतानाही आव्हाडांच्या मतदारसंघात निधीचा ओघ आटला नाही. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला. शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची या दुराव्यात मोठी भूमिका ठरली. त्यातून शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाचे मंत्रिपद येताच निधी वाटप तसेच महापालिका, एमएमआरडीए मार्फत करण्यात येणाऱ्या कामांचे श्रेय आव्हाडांना मिळू नये यासाठी व्यहूरचना केली जाऊ लागली. पुढे महायुतीची सत्ता आल्यानंतर आव्हाडांची आणखी कोंडी करण्यास सुरुवात झाली. कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा एक मोठा गट फोडण्यात आला.