एकाच पक्षाकडे अनेक जण इच्छुक असतात. उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असे सांगून एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इच्छुकांना शांत करणे, बंडखोरी रोखणे विजयासाठी आवश्यकच ठरते. जिल्ह्यातील एका मतदारसंघात चार-पाच जण इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून पहिल्या यादीतच उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर अन्य इच्छुक नाराज झाले. नाराजांना पक्षाच्या प्रचारास राजी करण्यासाठी तडजोडही झाली. निवडणूक प्रचारात खर्चापाण्यासाठी काही बिदागीही देण्याचे मान्य केले. पहिला हप्ताही दिला. मात्र, दुसरा हप्ता काही मिळण्याचे चिन्ह दिसेना. झालं. नाराज प्रचाराचे काम अर्ध्यावर सोडून बाजूला झाला. आता कसा निवडून येतो तेच बघतो असे म्हणत होते. निकाल लागल्यानंतर मात्र, सर्वात अगोदर गुलाल उधळत हार घालायला पुढे. यालाच म्हणतात खोबरं तिकडं चांगभलं.
उमेदवाराचे ‘गणित’
राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि महायुतीला पाशवी बहुमत मिळाले. निवडणुकीत बाजी मारण्यासाठी विजयी उमेदवारांनी मतांचे दान आपल्या बाजूला पडण्यासाठी आणि विरोधी मतांची विभागणी होण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा पुरेपूर वापर केल्याचे बोलले जाते. यातून नेत्यांचा भाव चांगलाच वधारला होता. सोलापूर जिल्ह्यात त्याचे रंगतदार किस्से ऐकायला मिळत आहेत.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या एका मतदारसंघात झालेल्या दुरंगी लढतीत आमदारकी शाबूत ठेवण्यासाठी एका माजी आमदाराला गोंजारण्याचा प्रयत्न केला. स्वपक्षाच्या उमेदवाराने पूर्वी दगा दिल्याचा राग मनात धरून हा माजी आमदार ‘पाटीलकी’च्या तोऱ्यात प्रतिस्पर्धी उमेदवाराला साथ देत होता. त्याच्या प्रभाव क्षेत्रातील सुमारे २० हजार मते मोलाची होती. म्हणून त्याची मदत विजयासाठी आवश्यक होती. पण तो माजी आमदार ‘भाव’ खाऊ लागला. शेवटी तो उमेदवार थेट मतदारांपर्यंत पोहचला. तिकडे चांगले मताधिक्य मिळाले. शेवटी निवडून आलेला उमेदवार पेशाने गणिताचा मास्तर.
दोन चाराचा संभ्रम
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अखंड निवडणूक काळात एक गमतीदार खेळ होत राहिला. येथे भाजपचे राहुल आवाडे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांच्यात लढत झाली. आवाडे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आले होते. प्रचार सभेवेळी मतदारांना अभिवादन करताना फडणवीस यांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे उपस्थित मतदार, नागरिकांकडे पाहत सुरुवातीला दोन बोटे उंचावून व्ही (व्हिक्टरी) अशी खूण दर्शवली. मात्र, उपस्थितांनी त्यांना दोन ऐवजी चार बोटे वर करण्यास सांगितले. सुरुवातीला त्यांनाही काही अर्थबोध होईना. त्यानंतर कानगोष्टी करीत त्यांना सांगण्यात आले की मतयंत्रात दुसऱ्या स्थानी मदन कारंडे आहेत आणि चौथ्या स्थानी राहुल आवाडे. दोन बोटे दाखवल्याने मतदारांपर्यंत वेगळाच अर्थ पोहोचेल. त्यावर त्यांनी चार बोटांची खूण केली. प्रचारकाळात बोटांचा असा खेळ बाहेरून आलेल्या नेत्यांना सतत करावा लागला. निकालानंतर कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, राहुल आवाडे तीन पिढ्यांनी प्रथमच दोन बोटे उंचावून विजयाची खूण मनापासून दर्शवली आणि बोटांच्या दोन-चारचा संभ्रमही मग अखेरीस संपुष्टात आला.
(संकलन : एजाज हुसेन मुजावर, दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे )