मुंबई : ‘नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही’ असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना लिहिले होते. तेव्हापासून मलिक यांना राष्ट्रवादीने दूरच ठेवले आहे. यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत अणुशक्तीनगर या मलिक यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांना उमेदवारी देणार का? मलिक अपक्ष लढणार की निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहणार, असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदारसंघाच्या पुनर्रचनेपासून नवाब मलिक यांनी अणुशक्तीनगर मतदारसंघावर पकड निर्माण केली. २००९ व २०१९ मध्ये ते या मतदारसंघातून निवडून आले. २०१४ मध्ये फारच कमी मतांनी पराभूत झाले होते. मराठी, दलित, मुस्लीम, उत्तर भारतीय अशी संमिश्र वस्ती असलेला अणुशक्तीनगर मतदारसंघ मलिक यांनी चांगल्या पद्धतीने बांधला होता. कुख्यात दाऊदला कुर्ल्यातील जागा हडप करण्यात मदत केल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने मंत्रिपदी असताना मलिक यांना अटक केली होती. त्यापूर्वी अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात मोहीम उघडल्यामुळेही मलिक हे भाजप नेत्यांना खुपत होते.

हेही वाचा >>>दिंडोरीच्या यशानंतर शरद पवारांची निफाडमध्ये मोर्चेबांधणी, आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ

राष्ट्रवादीतील बंडानंतर नवाब मलिक यांनी उघडपणे भू्िमका घेण्याचे टाळले होते. पण सुटकेच्या आशेने त्यांचा कल अजित पवारांच्या बाजूने होता. अजित पवारांनी शब्द टाकल्याने मलिक यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. कारण आधी वैद्याकीय कारणावरून जामिनाला विरोध करणाऱ्या ’ईडी’चा विरोध नंतर मावळला होता. जामिनानंतर सहा महिने मलिक प्रसिद्धीपासून दूरच होते. गेल्या डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये दाखल झाले. मलिक सभागृहात सत्ताधारी महायुतीच्या बाकांवर बसले. ही बाब भाजपला रुचली नाही. सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांना पत्र पाठविले. त्यात ‘नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत हे पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर मलिक यांना महायुतीची दारे बंद झाली आहेत. यामुळेच बहुधा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मलिक यांनी तटस्थ भूमिका स्वीकारली होती. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांना ३० हजारांचे मताधिक्य मिळाले होते.

अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादी अजित पवार गट नवाब मलिक यांना उमेदवारी देणार की नवा उमेदवार देणार? मलिक अपक्ष लढणार की निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहणार? असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.

हेही वाचा >>>फुटीर आमदारांवर कारवाई; काँग्रेसने नावे जाहीर करण्याचे टाळले

नवाब मलिक काय करणार?

नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजप पाठिंबा देणार नाही हे स्पष्टच आहे. मलिक यांच्याऐवजी त्यांनी बहिणीला किंवा अन्य नातेवाईकांना उभे करावे, असा पक्षात पर्याय आहे. पण नवाब मलिक हे आमदारकी सोडण्यास तयार होतील का? जामिनाची मुदत वाढवून मिळवण्यासाठी मलिक यांना भाजपला दुखावून चालणार नाही. मलिक यांनी अपक्ष निवडणूक लढविली तरीही महायुतीत शिवसेना शिंदे गट वा भाजपकडून उमेदवार उभा केला जाऊ शकतो. या साऱ्या गोंधळात अजित पवार यांच्या पक्षाची पंचाईत झाली आहे.

अजित पवारांसमोर पेच

राष्ट्रवादीची मुंबईत ताकद तशी मर्यादितच आहे. एकत्रित राष्ट्रवादीत असताना अजित पवार यांनी मुंबईत पक्षाची ताकद वाढली नसल्याबद्दल वर्धापन दिन कार्यक्रमात नापसंती व्यक्त केली होती. पण पक्षातील बंडानंतरही वर्षभरात मुंबईत पक्षाला फार काही जनाधार मिळालेला नाही. नवाब मलिक हे पक्षापेक्षा स्वत:च्या ताकदीवर निवडून येतात. अशा वेळी हक्काचा मतदारसंघ गमवावा का, असा अजित पवारांसमोर पेच निर्माण होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta rajkaran will the nationalist ajit pawar group give candidacy to nawab malik in anushaktinagar constituency in the upcoming assembly elections print politics news amy