आपटीबार
बोला, बोला बांगर तुम्ही जे मनात येईल ते बोला. निवडणूक आयोग कारवाई करेल अशी भीती अजिबात बाळगू नका. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा तुमचा स्वभाव नाही. जे आहे ते थेट बोलायचे. त्यामुळे बाहेरच्या मतदारांना आणण्यासाठी तुम्ही खुशाल ‘फोन पे’ करा. पाहिजे तर त्यासाठी एखादे स्वतंत्र कार्यालय उघडा. शेवटी पैसा तर ‘एक नंबर’नेच चालला ना! आयोगाला हरकत असण्याचे काहीच कारण नाही. त्यांचे काम ‘दोन नंबर’चा पैसा शोधण्याचे. गुवाहाटीहून परतून बराच काळ झाल्याने तुमचा त्याच्याशी काही संबंध असण्याची शक्यता नाही. तसेही कळमनुरी राज्याच्या एका टोकावर. तिथे रोजगार नसल्याने इतरत्र गेलेले मतदार परत तर आणावेच लागतील. त्यासाठी खर्च लागणार हे ओघाने आलेच. ते मतदार परत आले तर मतदानाचा टक्का वाढणार. म्हणजे आयोगाने केलेल्या आवाहनालाच हातभार. ही एकप्रकारे आयोगाची मदतच. असे स्पष्टीकरण देऊन तुम्ही सहज या वक्तव्यातून सहीसलामत सुटू शकता. तसेही आयोग तुमच्यावर मेहेरबान आहेच.
हेही वाचा >>> बांगर यांना निवडणूक विभागाची नोटीस; ‘फोनपे’वरील विधानावरील वाद
अगदी सुरुवातीपासून. तुमचे ते कावड यात्रेतले चित्रविचित्र वेशभूषा करून नाचणे, लोकांची कामे करत नाही म्हणून तुमचे ते अधिकाऱ्यांना रागावणे (कानशिलात नाही) या साऱ्या कृत्यांनी केवळ नांदेडच नाही तर राज्यातील जनता धन्य झालेली. आमदार असावा तर असा. लोकांसोबत नाचणारा. म्हणून कितीही तक्रारी विरोधकांनी केल्या तरी फारफार तर आचारसंहिता भंगाची नोटीस येईल किंवा आली असेल. पुढे समज दिली जाईल. बस्स. शिंदेंनी केलेल्या बंडामुळे तुम्ही अवघ्या राज्याला ठाऊक झालात. भलेही तुम्हाला उद्धवजींनी शोधले असले तरी. इतकी लोकप्रियता लाभलेले शहाजी बापूनंतर तुम्हीच. त्यामुळे सामदामदंडभेदाचा वापर करून तुम्ही विजयी व्हाच संतोषभाऊ. ‘फोन पे’ तर खूपच साधी व्यवस्था झाली हस्तांतरणाची. त्यापलीकडे विचार करा व काही सुचले तर बेधडक बोला. तुम्ही शांत राहिले तर निवडणुकीत रंगत कशी येईल?
– श्री. फ. टाके
© The Indian Express (P) Ltd