मुंबई : माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे. या भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे केले.

चर्नी रोड (प.) येथील जवाहर बालभवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन आणि मुंबई महापालिका विकास निधी व मुंबई शहर जिल्हाअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना यातून होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन / लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. समारंभास विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा >>>“मतांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकवा”, राज ठाकरे यांचे मतदारांना आवाहन

या भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धन, संशोधन आणि प्रसारासाठी अधिक बळ मिळेल. भाषा भवनसाठी साहित्यिक व अन्य क्षेत्रातून आलेल्या सूचनांचा आदर केला जाईल, असे शिंदे यांनी नमूद केले. मराठी भाषा दोन हजार वर्षांपेक्षा अधिक जुनी असल्याचे सिद्ध झाले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेकांचे योगदान मिळाले आहे. सर्वांनी केलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. संतांनी अभंग, गवळण, भारुड यातून मराठी भाषेचे सौंदर्य समोर आणले. मराठी भाषेच्या वैभवात भर घातली. ज्ञानपीठकारांनी आणि सर्व साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे असे सांगून मराठी भाषेच्या विकासासाठी जे-जे करता येईल ते केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.