मुंबई : राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत चार वर्षे खासदारकीची मुदत शिल्लक असलेली जागा महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी सोडण्यात आली आहे. तर पावणे दोन वर्ष मुदत शिल्लक असलेली जागा भाजपचे धैर्यशील पाटील यांना मिळणार आहे. पीयूष गोयल व उदयनराजे भोसले यांनी लोकसभेवर निवड झाल्याने राज्यातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. यापैकी गोयल यांची राज्यसभेची मुदत ही जुलै २०२८ पर्यंत आहे तर भोसले यांची मुदत एप्रिल २०२६ पर्यंत शिल्लक आहे.
पीयूष गोयल यांची रिक्त होणारी जागा आम्हाला मिळावी, अशी राष्ट्रवादीने भाजपकडे मागणी केली होती. तसे आश्वासन लोकसभेच्या जागावाटपाच्या वेळी देण्यात आले होते, असे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>Assam Row: आसाममध्ये बदलापूरसारखा उद्रेक; अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणात मारवाडी समाज लक्ष्य
उमेदवारी अर्ज दाखल करताना पीयूष गोयल यांच्या लोकसभेवर निवडीने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नितीन पाटील जाधव यांनी दाखल केला. परिणामी पाटील यांना जुलै २०२८ पर्यंत राज्यसभेची खासदारकी मिळणार आहे. उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपचे धैर्यशील पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अन्य दोघांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असले तरी सूचक व अनुमोदक म्हणून आमदारांच्या पुरेशा स्वाक्षऱ्या नसल्याने हे अर्ज बाद होतील. परिणामी नितीन पाटील आणि धैर्यशील पाटील यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. राष्ट्रवादीला अपेक्षित अशी चार वर्षांची खासदारकी भाजपने मान्य केली आहे. याउलट भाजपचे धैर्यशील पाटील यांना पावणे दोन वर्षांचीच खासदारकी मिळाली आहे. मित्र पक्षाला दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यात आल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत होते.
हेही वाचा >>>Badlapur : बदलापूरमधली लैंगिक अत्याचाराची घटना आणि महाराष्ट्रात उठलेलं राजकीय वादळ
राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या आता चार
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार निवडून आले होते. प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे आधीपासूनच खासदार होते. सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या आता चार होईल. यामुळेच प्रफुल्ल पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून नेमणूक करावी, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. तेव्हा दोनच खासदार असल्याने राष्ट्रवादीला केवळ राज्यमंत्रीपद (स्वतंत्र कार्यभार) मोदी सरकारमध्ये देऊ करण्यात आले होते. पण पटेल यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्रिपद भूषविले असल्याने त्यांनी राज्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता. आता ती चूक दुरुस्त करावी, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.
© The Indian Express (P) Ltd