जालना – ‘महायुती’च्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवून पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा ‘महायुती’मधील शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भारतीय जनता पक्षात पायघड्या घातल्या जात आहेत.
परतूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आसाराम बाेराडे यांनी लढविली आणि भारतीय जनता पक्षाकडून उभे राहिलेले ‘महायुती’चे अधिकृत उमेदवार बबनराव लोणीकर यांनी त्यांचा पराभव केला हाेता. पराभव झाल्यानंतर त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश झाला. त्यांना पक्ष प्रवेशच देण्यात आला नाही तर शिवसेनेच्या (शिंदे) जिल्हा प्रमुख पदावरही त्यांची वर्णी लावण्यात आली.
परतूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाला सोडवून घेण्यात माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांना यश आले नव्हते. त्यामुळे हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेला. जेथलिया यांनी या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली. बोराड आणि जेथलिया हे दोघेही भाजपचे बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध पराभूत झाले. आता हे दोघेही पराभूत उमेदवार लोणीकर यांच्या पक्षाचा समावश असलेल्या ‘महायुती’चा भाग बनले आहेत.
वास्तविक पाहता लोणीकर यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी बोराडे आणि जेथलिया यांच्या महायुतीतील घटक पक्षातील प्रवेशास विरोध केला होता. परंतु जालना येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात बोराडे यांचा पक्षप्रवेश झाला. तर परतूर येथे मोठी गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करीत जेथलिया यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला.
महायुतीत घनसावंगी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेस (शिंदे) सुटला होता. निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत असलेले डाॅ. हिकमत उढाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. भाजपचे एक पदाधिकारी आणि खासगी साखर कारखानदार सतीश घाडगे यांनी उढाण यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली. परंतु ते पराभूत झाले. ‘महायुती’विरुद्ध निवडणूक लढवून अपयश आल्यानंतर त्यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला. जालना विधानसभा मतदारसंघात ‘महायुती’चे उमेदवार अर्जुन खोतकर (शिवसेना-शिंदे) यांच्याविरुद्ध भाजपचेे जालना शहराध्यक्ष अशोक पांगारकर यांनी निवडणूक लढविली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते स्वगृही परतले आहेत.
‘महायुती’मधील घटक पक्षांना आपले पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. जालना जिल्ह्यात आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षात (शिवसेना-शिंदे) येणारांची संख्या वाढत आहे. ‘महायुती’च्या विरोधात निवडणूक लढवून पराभूत झालेल्या उमेदवाराचा केवळ आमच्याच पक्षात प्रवेश झाला असे नाही. तर राष्ट्रवादीत (अजित पवार) एका आणि भाजपमध्ये दोन पराभूत उमेदवारांचा प्रवेश झालेला आहे. – पंडितराव भुतेकर, जिल्हा संपर्क प्रमुख (शिवसेना-शिंदे).