उमाकांत देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असा राजकीय प्रवास करून आलेल्या मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याने जुन्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याने त्यांच्यापुढे विरोधकांबरोबरच स्वकीयांचेही आव्हान आहे. अंधेरीतील झोपु योजनेत वाद व आरोप झाल्याने आणि जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे नगरसेवकपद रद्द झाल्याने अडचणीत आलेल्या पटेल यांनी ‘ जीवन ज्योत प्रतिष्ठान ‘ मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवित राजकीय कारकीर्द सावरण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : धुळे मनपात सत्ताधारी भाजपची कोंडी ; समस्या सुटत नसल्याने स्वपक्षीयांचा वैताग

सुमारे २० वर्षे राजकारणात असलेल्या मुरजी पटेल यांनी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्याबरोबर त्यांनी काही वर्षे काम केले आणि काँग्रेस पक्ष संघटनेत जिल्हा स्तरावर पदाधिकारी झाले. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीनंतर पटेल हे शिवसेनेत गेले. पण रमेश लटके यांच्याबरोबर त्यांचे फारसे जमले नाही. त्यामुळे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीआधी पटेल आणि त्यांच्या पत्नी केशरबेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पटेल हे प्रभाग क्रमांक ८१ आणि केशरबेन या प्रभाग क्रमांक ७४ मधून निवडून आले. मात्र पाटीदार समाजातील पटेल पती-पत्नीने ओबीसी म्हणून सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले. त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊनही पटेल यांची याचिका फेटाळली. त्यामुळे एप्रिल २०१९ मध्ये मुरजी पटेल व केशरबेन यांचे नगरसेवकपद गेले.

हेही वाचा : अंधेरी पूर्वची शिवसेनेची विजयी जागा अखेर भाजपच लढविणार; ढाल-तलवार निवडणूक आखाड्याबाहेरच

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला व रमेश लटके यांना उमेदवारी देण्यात आली. पटेल हे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे विश्वासू होते. त्यावेळी लटके विरोधात भाजपने फूस दिल्याने पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यात लटके यांना ६२ हजार ७७३ तर पटेल यांना ४५ हजार ८०८ मते मिळाली होती. रमेश लटके यांच्या निधनानंतर मुरजी पटेल यांनी ही पोटनिवडणूक लढविण्यासाठी गेल्या चार-पाच महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. या मतदारसंघातील दिवंगत भाजप नेते सुनील यादव यांच्याकडे जुन्या भाजप व संघ कार्यकर्त्यांचा राबता असे. पण पटेल यांचे या नेत्यांशी फारसे पटले नाही. अन्य पक्षातून आलेल्या नेत्याला संधी दिली जात असल्याने जुन्या स्थानिक भाजप नेत्यांची नाराजी आहे. त्यातच ॠतुजा लटके यांच्याबाबत शिंदे गटातील काही नेत्यांची सहानुभूती असल्याने पटेल यांना निवडणुकीत ते किती मदत करणार, याबाबत प्रश्न आहे.

हेही वाचा : पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

बांधकाम व्यवसायात असलेल्या पटेल यांनी ‘ जीवनज्योत प्रतिष्ठान ‘ च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे बरीच कामे केली असून सामाजिक उपक्रम राबविले आहेत. महिलांसाठी बचत गट, गरजूंसाठी आर्थिक व वैद्यकीय मदत दिली जाते. मुले व तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अंधेरी महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते. हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा आदी विविध स्पर्धा व उपक्रम राबविले जातात. ज्येष्ठ नागरिकांना आंगणेवाडी यात्रा आणि शिर्डी येथे जाण्याची मोफत व्यवस्था यंदा प्रतिष्ठानने केली होती. तरी भाजपमधील अंतर्गत नाराजीमुळे पटेल यांना ही निवडणूक सोपी नसून ॠतुजा लटके यांचे मोठे आव्हान आहे. अटीतटीच्या या लढाईत स्वकीयांच्या मदतीवर बरेच काही अवलंबून आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lost corporator post invalid caste certificate muraji patel congress bjp shivsena andheri by election print politics news tmb 01
Show comments