सांगली : विधानसभेची निवडणूक नजरेच्या टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता निवडणुकीतील उमेदवारीचे वेध लागले आहेत. एकदा का निवडणुकीचे रणमैदान सुरू झाले की, पुन्हा देवदेवस्की करता येणार नाही यामुळे काही मंडळी आताच देवदेवस्कीचे सोपस्कार आटोपून घेण्याच्या आणि ज्योतिषाच्या दारी जात आहेत. सांगली जिल्हाही याला अपवाद नाही. जिल्ह्यात एका मतदार संघात एक कार्यकर्ता उमेदवारीसाठी महाआघाडीतून प्रयत्नशील आहेत. पण याच ठिकाणी अन्य एकजण इच्छुक असल्याने मलाच उमेदवारी मिळावी यासाठी त्यांने देवदेवस्की आषाढ महिन्यातच आटोपून घेतली. पक्षांतर्गत विरोधकाला उमेदवारी न मिळता त्याने महायुती आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात राजकीय हालचालीचे केंद्र ठरलेल्या गुवाहटीच्या कामाख्या देवीलाच साकडे घातले. यासाठी प्राण्याचा बळी देउन कौलही मागितला आहे. आता देवी कोणाला प्रसन्न होते, आणि कोणाला जय महाराष्ट्र म्हणते ते लवकरच कळेल.
अशाच नेहमी निवडणुका होवोत ….
विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना अनेक इच्छुक मंडळींनी आमदारकीचे स्वप्न रंगवत जनसंपर्क वाढवला आहे. त्यातून समाजसेवेला अक्षरश: ऊत आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात सध्या सकाळ, दुपार, संध्याकाळी घडणाऱ्या समाजसेवेमुळे सामान्य जनतेचे भले होत आहे. गावात सकाळी कोणी शालेय साहित्य वाटप करतो तर दुपारी कोणी महिलांना साड्या आणून देतो. तर कोणी तरुणांसाठी उपक्रम राबवितो. गावकऱ्यांना अष्टविनायक दर्शनापासून तिरुपती बालाजी, काशी, अयोध्या, मथुरा दर्शनापर्यंतची सेवा घडविण्यासाठी इच्छुकांच्या रूपाने साक्षात श्रावण बाळ वाढले आहेत. गावात एखाद्याचे घर जळाले तर आर्थिक मदतीसाठी तात्काळ धावून येणारेही वाढले आहेत. त्यामुळे गावकरी मंडळींचा रुबाब चांगलाच वाढला आहे. यातूनच गावकरी म्हणू लागले नेहमीच निवडणुका व्हाव्यात!
(संकलन : दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर)