‘कटेंगे तो बटेंगे’ हा नारा भाजपाने ( BJP ) विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिला आहे. तसंच ‘एक है तो सेफ है’ हा नाराही दिला आहे. भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात धर्मांतरबंदी कायद्याचंही वचन दिलं आहे. हिंदुत्वाचा अजेंडाही आहेच. तसंच वक्फ बोर्डाला समर्थन देऊन काँग्रेस तुमच्या जमिनी लुटण्याच्या तयारीत आहे असाही प्रचार केला जातो आहे. भाजपाने कुठले कुठले मुद्दे महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचारात आणले ते आपण जाणून घेऊ.
योगी आदित्यनाथ काय म्हणाले?
मागच्या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये निवडून आलेल्या नव्या सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळण्यासाठी एक ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर भाजपाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम ३७० चा मुद्दाही आणला आहे. हा मुद्दा काँग्रेसच्या विरोधात आणला गेला आहे हे तर उघडच आहे. तसंच रझाकारांचा मुद्दाही भाजपाचे ( BJP ) नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे. रझाकारांनी तुमच्या गावातली घरं कशी जाळली? तुमच्या आई आणि बहिणीची हत्या कशी केली? कुटुंबातल्या सदस्यांना कसं मारलं ते आठवा असं योगी आदित्यनाथ मल्लिकार्जुन खरगेंना उद्देशून म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला औरंगजेबाचा मुद्दा
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एआयएमआयएमवर टीका करताना औरंगजेबाचा मुद्दा समोर आणला आहे. औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर हेच आम्ही म्हणणार असं ओवैसींना त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. तसंच औरंगजेबाविषयी शिवराळ भाषा वापरत त्यांनी ओवैसींना लक्ष केलं आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानावरही भगवा झेंडा फडकवून असा विश्वास व्यक्त केला आहे.
लव्ह जिहादचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा कधी आला?
दोन महिन्यांपूर्वी हिंदुत्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात आणला गेला. सकल हिंदू समाज, लव्ह जिहाद विरोधी रॅली या काढण्यात आल्या. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला म्हणून आपल्याला अनेक जागा जिंकता आल्या नाहीत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आत्ताही काही मुलाखतींमध्ये त्यांनी हा उल्लेख केला आहे. तसंच वर्सोवा या ठिकाणी बोलत असताना या ठिकाणी लँड जिहाद झाला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तसंच या व्होट जिहादला धर्मयुद्धाने उत्तर द्या असंही त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ( BJP ) फक्त ९ जागा महाराष्ट्रात मिळाल्या. २०१९ मध्ये ही संख्या २३ होती.
मराठा फॅक्टरचं काय झालं?
सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाकडून ( BJP ) जातीचा मुद्दा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नांना अपेक्षित यश मिळालं नाही. भाजपाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर हे सांगितलं की कृषी क्षेत्रासाठी कल्याणकारी योजनांचा विस्तार करुन ज्या सुधारणा आणल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप कमी होईल. शेतकऱ्यांचा रोष इतका वाढेल असं वाटलं नव्हतं. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तीव्र झालेला पाहण्यास मिळालं. तसंच मनोज जरांगे यांनी उमेदवार दिलेले नाहीत. कुणालाही पाठिंबा द्या किंवा निवडून द्या असं मी सांगत नाही अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली. याचा महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो असंही या नेत्याने सांगितलं. या सगळ्या गोष्टींमधून वाट काढण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा आणला गेला असाही एक मतप्रवाह आहे. नागपूर शहर भागात प्रचारादरम्यान राम मंदिर ते कलम ३७० हे मुद्दे उपस्थित करण्यात आले. एवढंच नाही तर विदर्भातच योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदा कटेंगे तो बटेंगे हा नारा दिला आहे. हा नारा त्या ठिकाणी आलेल्या विस्थापित उत्तर भारतीयांनाही उद्देशून होता यात शंकाच नाही.
भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा कसा आणला?
हिंदू ज्या भागांमध्ये बहुसंख्य आहेत तिथे भाजपाला मदत होऊ शकते. भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करण्याचं कारण हेच दिसून येतं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला नारा एक है तो सेफ है हा देखील चर्चेत आहे. महाराष्ट्रात १५ मतदारसंघ असेल आहेत ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या जास्त आहे. हे प्रमाण या मतदारसंघांमध्ये ३० ते ७८ टक्के इतकं आहे. तर राज्यात सध्याच्या घडीला १२ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. नागपूर आणि विदर्भात जे झालं तेच धुळ्यातही घडलं. धुळ्यातही हे दोन नारे देण्यात आले. हिंदू मतं मिळवण्यासाठी भाजपाकडून हे केलं जातं आहे.
बाळासाहेब थोरातांची टीका, शिवराय कुलकर्णींचं उत्तर
भाजपाच्या या अजेंड्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. भाजपाने वक्फचा मुद्दा आणला. मात्र १२ पैकी सात जागा या अधिकृतरित्या महसूल खात्याकडे नोंदणी करण्यात आलेल्या आहेत. एखाद्याचे हक्क कसे काय हिरावून घ्यायचे? शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी भाजपाकडून हे चाललं आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपाचे नेते शिवराय कुलकर्णी म्हणाले की योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी जे सांगत आहेत ते जमिनीवरचं वास्तव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है चा नारा दिला तर बटेंगे तो कटेंगे हा नारा योगी आदित्यनाथ यांनी दिला. यात गैर काय? असा सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.