जयेश सामंत
ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे दृश्य परिणाम ठाणे जिल्ह्यात दिसू लागले असले तरी आजही शिवसेनेचे काही पदाधिकारी, माजी नगरसेवक, शिवसैनिकांची एक मोठी फळी राज्यातील बंडाचे केंद्रबिंदू ठाणे असल्यामुळे अस्वस्थ दिसत आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर यासारख्या शहरांमध्ये शिंदे यांचा मोठा प्रभाव असला तरी या शहरांमधील ठराविक प्रभागांमध्ये प्रभावी असलेला शिवसेनेचा एकगठ्ठा मतदार या बंडाला किती साथ देईल याविषयी अनेकांच्या मनात कमालीचा संभ्रम आहे. मागील काही वर्षांत शिवसेनेचा ठाणे जिल्ह्यातील प्रमुख विरोधक काॅग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा भाजप आहे. विशेषत: जिल्ह्याचा ग्रामीण पट्टा, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या शहरांमध्ये भाजप हा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसाठी प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. शिंदे यांचा जिल्ह्यातील एकंदर दरारा पाहता तूर्त जिल्हा शिवसेनेत शुकशुकाट असला तरी निष्ठावंत शिवसैनिकांना नेत्याचा आधार हवा आहे.
राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार असतानाही जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेच्या माध्यमातून मोठा दबदबा राहिला आहे. राज्यात सत्ताबदल होताच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिंदे यांच्याकडे आले आणि हा प्रभाव दिवसागणिक वाढत गेला. युती सरकारमध्ये सुरुवातीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने संघर्ष झालेला पाहायला मिळाला. मात्र ती नूरा कुस्ती होती अशी गट्टी फडणवीस व शिंदे यांच्यात नंतर दिसली. सरकार आणि मातोश्रीतील दुवा म्हणून या काळात शिंदे यांचा प्रभाव वाढला होता. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत फडणवीस यांनी ज्याप्रमाणे झोकून दिले तितकेसे लक्ष त्यांनी ठाण्यात दिले नाही अशी चर्चा तेव्हापासूनच दबक्या आवाजात सुरू होती. फणडवीस-शिंदे मैत्रीचा असाही अनुभव ठाण्यातील भाजप नेत्यांनी त्यावेळी घेतला. ठाणे महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविल्यामुळे शिंदे यांचे राज्यातील आणि जिल्ह्यातील राजकारणात वजन आणखी वाढल्याचे दिसून येते. नेमका हाच प्रभाव शिंदे यांना सध्याच्या बंडात कामी येत असून त्यांच्यानंतर शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना साद घालेल असा दुसऱ्या फळीतील नेताच जिल्ह्यात उरला नसल्याने बंडामुळे अस्वस्थ शिवसैनिकांची मोट कोण बांधेल असा पक्ष सध्या मातोश्रीला सतावू लागला आहे. त्याचबरोबर शिवसेनेशी निष्ठावंत राहून शिंदे यांना विरोध करताना आपल्याला आधार कोणाचा मिळणार असा प्रश्न ठाण्यातील शिवसैनिकांना पडला आहे.
शिंदेसेनाही सावध
शिंदे यांच्या बंडानंतर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पक्ष संघटनेत शुकशुकाट पसरला आहे. नवी मुंबईत शिंदे यांचा प्रभाव जिल्ह्यातील इतर भागाच्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे बंडाच्या पहिल्याच दिवशी काही शिवसैनिकांनी निदर्शनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या बंडाच्या नेमक्या स्वरूपाविषयी संभ्रम निर्माण होताच नवी मुंबईतील हा कार्यक्रमही स्थगित करण्यात आला. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपाखाडी आणि वागळे इस्टेट भागात ते म्हणतील तीच पूर्वदिशा असे एकंदर चित्र असते. तरी जुन्या ठाणे शहरात अजूनही शिवसेनेतील एक मोठा गट या सर्व घडामोडींमुळे अस्वस्थ आहे. डोंबिवलीतील पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी शिंदे यांना पाठींबा जाहीर केला असला तरी भाजपसोबत स्थानिक पातळीवर संघर्षाच्या तयारीत असलेल्या अनेक इच्छुकांनी अजूनही थांबा आणि वाट पाहा हीच भूमिका कायम ठेवली आहे. अंबरनाथ, बदलापुरात थेट मातोश्रीशी संबंध असलेले काही नेते शिवसेनेत आहेत. त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असला तरी या मंडळींनीही आपली भूमिका जाहीर केलेली नाही. आमदार बालाजी किणीकर शिंदे यांच्या सोबत आहेत तर याच भागातील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनीही शिंदे यांच्यासोबत रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. नवी मुंबईतून माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे शिंदे समर्थक मानले जातात. ही अस्वस्थता लक्षात घेऊन शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दोन दिवसांपासून जिल्ह्यातील नेत्यांना संपर्क साधण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. ठाणे शहर तसेच जिल्ह्यातील इतर शहरांमधील नेत्यांसोबत खासदार शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के दुरध्वनीवरून संपर्क साधत आहेत. काही नेते, पदाधिकाऱ्यांना लुईसवाडी येथील बंगल्यावर बोलावून घेतले जात आहे. या सर्व घडामोडीत शिवसेनेत राहू इच्छिणाऱ्यांची मोट बांधणारा एकही नेता पुढे आलेला नाही. खासदार राजन विचारे पहिल्या दिवशी मातोश्रीच्या बाजूने सक्रिय दिसत असले तरी मागील दोन दिवसात त्यांच्या भूमिकेविषयीही संभ्रम निर्माण झाला आहे.