एजाज हुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले धैर्यशील मोहिते-पाटील यांनी निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात गावभेटीच्या नावाखाली दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला होता. पण अचानक त्यांची गावभेट थांबली आहे. यातून मोहिते-पाटील टोकाची भूमिका घेणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

रासपचे नेते महादेव जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असतानाच जानकर हे महायुतीत दाखल झाले आहेत. मोहिते-पाटील हे सुध्दा माघार घेण्याच्या मनःस्थितीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार यांची रणनीती कशी राहणार, याची आता उत्सुकता आहे. या मतदारसंघात शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे उमेदवार असतील का, याबाबत स्पष्टता नाही.

आणखी वाचा- वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल

रासपचे नेते महादेव जानकर हे महायुतीमध्ये दाखल होऊन परभणीची जागा लढविण्याची तयारी करीत असताना दुसरीकडे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतून माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील यांचे भाजपच्या विरोधातील संभाव्य बंड शमल्याचे संकेत मिळाले आहेत. इकडे स्वतः धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मतदारसंघात करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस, फलटण, माण-खटाव परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू केलेला गावभेट दौरा थांबविला आहे. या गावभेट दौ-यात त्यांच्या पत्नी शीतलदेवी यांच्यासह चुलत बंधू शिवतेजसिंह, अर्जुनसिंह तसेच चुलत बहीण स्वरूपाराणी आदींनी दररोज दहा-दहा गावांना भेटी देऊन अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू केला. मात्र मोहिते-पाटील हे आपण भाजपमध्येच असून लोकसभा निवडणुकीत जनमत अजमावण्यासाठी फिरत असल्याचे स्पष्टीकरण देत होते. तर निवडणूक राजकारणात नेहमीच किंगमेकरची भूमिका बजावणारे त्यांचे चुलते जयसिंह मोहिते-पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात कोणी उभे राहात नसतील तर आपण स्वतः निवडणूक रणसंग्रामात उतरणार असल्याचे जाहीर करून धैर्यशील मोहिते-पाटील यांचे परतीचे दोर कापण्याचा प्रयत्न केला होता.

आणखी वाचा-सुनील तटकरेंचाही कडेलोट करावा लागेल… शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे धक्कादायक वक्तव्य

खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना तीव्र विरोध करणारे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी सुरूवातीला अकलूजमध्ये येऊन मोहिते-पाटील यांच्याशी खलबते केली होती. नंतर त्यांनी फालटणमध्ये समर्थकांचा मेळावा घेऊन तशी भूमिकाही जाहीर केली होती. मोहिते-पाटील कुटुंबीयांना शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगोल्यातील शेकापचे नेते डॉ. आनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह भेटून चर्चा केली होती. डॉ. अनिकेत देशमुख यांचे नाव खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात पर्यायी उमेदवार म्हणून पुढे आले होते. धैर्यशील मोहिते-पाटील यांनाही भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाची ‘ तुतारी ‘ वाजविण्याचा प्रस्ताव आला होता. दुसरीकडे धनगर समाजाच्या मतपेढीचा विचार करून महाविकास आघाडीकन रासपचे नेते महादेव जानकर या़ंच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गावभेटी थांबवून संभाव्य बंड मागे घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. गावभेटीदरम्यान शिखर शिंगणापुरात महादेव मंदिरात दर्शन घेताना धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सोबत रामराजे निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत निंबाळकर होते. त्यांची महादेव मंदिरातील भेट योगायोगाने झाल्याचा दावा उभय नेत्यांनी केला असला तरी त्यांनी येत्या १२ एप्रिलपर्यंत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे गूढ कायम असतानाच अखेर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी तलवार म्यान केल्याचे तसेच रामराजे निंबाळकर यांचीही भाजपला सहकार्य करण्याची मानसिकता तयार झाल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madha lok sabha constituency dhairyashil mohite patils potential rebellion against bjp is failed print politics news mrj
Show comments