विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. काँग्रेसमधून भाजपात पक्षांतर केलेले तसेच काँग्रेसचे कमलनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार पाडण्यात अग्रणी भूमिका बजावणारे भाजपाचे नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यावरदेखील भाजपाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. सिंदिया यांचे ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशात मोठे राजकीय प्रस्थ आहे. याच कारणामुळे या प्रदेशातील विधानसभेच्या ३४ जागा भाजपाला मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर ते येथे जोमात प्रचार करत आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना त्यांनी वेगवगेळ्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशात ३४ विधानसभा मतदारसंघ

ज्योतिरादित्य सिंदिया हे ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील सदस्य आहेत. ते याआधी काँग्रेस पक्षात होते. मात्र, त्यांनी अनेक आमदारांना सोबत घेत भाजपात पक्षांतर केले. त्याचाच परिणाम म्हणून कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आले आणि काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. दरम्यान, आता ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशातील एकूण ३४ विधानसभा मतदारसंघात भाजपाचा प्रचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या जागांवर काँग्रेसला पराभूत करून ज्योतिरादित्य सिंदिया यांना त्यांचे राजकीय वजन दाखवून द्यावे लागणार आहे. याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून ते या प्रदेशात हिरिरीने प्रचार करत आहेत.

“अगोदर मध्य प्रदेशला आजारी राज्य म्हटले जायचे”

मध्य प्रदेशमध्ये गेल्या १८ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. याच कारणामुळे मध्य प्रदेशच्या लोकांमध्ये सत्ताविरोधी भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरच सिंदिया यांना विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, मध्य प्रदेशमध्ये कोठेही सत्ताविरोधी भावना नाही. गेल्या १८ वर्षांत भाजपाच्या सरकारने आपली योग्यता सिद्ध केली आहे. अगोदर मध्य प्रदेशला आजारी राज्य म्हटले जायचे. भाजपाच्या शासनकाळात मात्र मध्य प्रदेश सर्वोत्तम राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य प्रदेशचे दरडोई उत्पन्न ११ हजार ४१० वरून एक लाख ४० हजार ६२ रुपयांपर्यंत वाढले आहे. अगोदर ४४ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते होते. आता मात्र मध्य प्रदेशमध्ये पाच लाख किलोमीटरचे रस्ते आहेत. विकासाचा अजेंडा पुढे चालू ठेवायचा असेल तर लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंह चौहान यांचे सरकार हा सर्वोत्तम पर्याय आहे.

“शिवराजसिंह चौहान यांनी गेल्या १५ वर्षांत खूप चांगली कामगिरी केलेली आहे, असे मला वाटते. पक्ष मला ज्या ठिकाणी प्रचार करायला सांगेल, त्या प्रत्येक ठिकाणी मी जाणार आहे. काँग्रेसमध्ये असताना २०१८ सालच्या निवडणुकीतही मी सर्वत्र प्रचार केला होता. यावेळीही मी संपूर्ण राज्यभर प्रचार करणार आहे”, असेही ज्योतिरादित्य सिंदिया यांनी स्पष्ट केले.

“मी भाजपा पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता”

भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंदिया यांचा विरोध केला होता. हा विरोध आजही काही प्रमाणात आढळतो. यावरही सिंदिया यांनी भाष्य केले. “मी भाजपा पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाचा कार्यकर्ता हाच माझ्या पक्षाची ताकद आहे, असे मी समजतो”, असे सिंदिया म्हणाले. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, देशात ओबीसींची संख्या किती आहे हे समजायला हवे अशी भूमिका विरोधकांकडून घेतली जात आहे. कमलनाथ यांचे सरकार असताना काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू केले होते. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर पडणार का? असे सिंदिया यांना विचारण्यात आले. यावर बोलताना, “ओबीसींना आरक्षण हे कमलनाथ यांनी नव्हे, तर शिवराजसिंह चौहान यांनी दिले होते. काँग्रेसनेच ओबीसी आयोगाला विरोध केला होता. काँग्रेसनेच मंडल आयोगाला विरोध केला होता. ओबीसी समाजातील नेते, तरुण, महिला कार्यकर्ते, महिला नेत्यांचे प्रमाण भाजपामध्ये काँग्रेसपेक्षा अधिक आहे”, असे सिंदिया यांनी सांगितले.

“रेवडी वाटप आणि सबलीकरण यात फरक”

मोफत सुविधा देऊन काँग्रेस तसेच इतर पक्ष देशात रेवडी संस्कृती रुजवू पाहात आहेत, असा दावा भाजपाकडून केला जातो. मात्र, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवराजसिंह चौहान सरकारने लाडली बहना योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना म्हणजे रेवडी संस्कृती नाही का? असा प्रश्न सिंदिया यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताने सिंदिया म्हणाले की, रेवडी वाटप आणि सबलीकरण यात फरक आहे. राज्यातील लाखो महिलांकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. अशा महिलांचे सबलीकरण करणे गरजेचे नाही का? लाडली बहना योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमध्ये पात्र महिलांच्या खात्यात महिन्याला १२५० रुपये जातात, ही बाब चांगली नाही का? गरीब शेतकऱ्यांनाही प्रतिमहिना १००० रुपयांची मदत केली जाते, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आहे.

“भाजपा हे माझ्यासाठी कायमच घराप्रमाणे”

भाजपा पक्षात गेल्यानंतर तुम्हाला कसे वाटते? असा प्रश्न सिंदिया यांना विचारण्यात आला. यावरही त्यांनी उत्तर दिले. “भाजपा हा पक्ष माझा परिवार आहे. भाजपा आजूबाजूला असताना मी वाढलो आहे. माझी आजी भाजपाच्या संस्थापकांपैकी एक होती. माझ्या वडिलांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपातूनच केली. मी जेव्हा काँग्रेसमध्ये होतो, तेव्हादेखील भाजपाच्या अनेक नेत्यांशी माझे चांगले संबंध होते. भाजपा हे माझ्यासाठी कायमच घराप्रमाणे राहिलेले आहे”, असे सिंदिया म्हणाले.

“…तर पक्ष सोडून जाण्याची परिस्थितीच उद्भवली नसती”

ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काँग्रेस पक्षाला दगा दिला, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जातो. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “काँग्रेस पक्ष अजूनही माझा विचार करून वेळ घालवत आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने जी आश्वासनं जनतेला दिली होती, ती पूर्ण केली असती तर मी पक्ष सोडून जाण्याची परिस्थितीच उद्भवली नसती. एका बाजूला देशाला पुढे नेणारा नेता आहे, तर दुसरीकडे असा पक्ष आहे, जो चांगल्या लोकांचा सन्मान करत नाही. मध्य प्रदेशमधील काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार, खुर्चीचा खेळ चालतो. याच कारणामुळे मला या पक्षात राहायचे नाही, असे मी म्हणालो होतो”, असे स्पष्टीकरण सिंदिया यांनी दिले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh assembly election 2023 bjp given jyotiraditya scindia responsibility of 34 constituency prd
Show comments