विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे भाजपा आणि काँग्रेस या पक्षांत थेट लढाई होणार आहे. याच कारणामुळे दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. असे असतानाच आता काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय यांच्या एका व्हिडीओचा आधार घेत काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असा दावा भाजपाकडून केला जात आहे. तर दिग्विजय सिंह आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत, असे स्पष्टीकरण देत काँग्रेसमध्ये सर्वाकाही आलबेल आहे, असे कमनलाथ यांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पक्षाच्या सर्व कागदपत्रांवर प्रदेशाध्यक्षांची सही”

कमलाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. याच कार्यक्रमातील व्हिडीओचा आधार घेत काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आहे, असा दावा भाजपाने केला. या व्हिडीओमध्ये ‘मी दिग्विजय सिंह यांचे कपडे फाडावेत असे म्हणालो होतो. लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या जात नसतील तर जनतेने तसे केले पाहिजे,’ असे कमलनाथ म्हणताना दिसत आहेत. यावेळी दिग्विजय सिंह हे मंचावर उपस्थित होते. त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांना मध्येच थांबवत ‘पक्षाच्या सर्व कागदपत्रांवर प्रदेशाध्यक्षांची (कमलनाथ) सही आहे. त्यामुळे कोणाचे कपडे फाडायला हवेत?’ असा मिश्किल सवाल केला. दिग्विजय सिंह यांच्या या सवालानंतर काँग्रेसच्या इतर नेत्यांमध्ये हशा पिकला.

हेही वाचा : Telangana : कल्याणकारी योजना विरुद्ध बेरोजगारी-लाचखोरी; तेलंगणच्या जनतेसमोर काय आहेत पर्याय?

कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यात काय संभाषण झाले?

दिग्जविजय सिंह यांच्या सवालाला कमलनाथ यांनीदेखील तेवढ्या तत्परतेने उत्तर दिले. ‘आमच्यात खूप सलोख्याचे संबंध आहेत. बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्यांना कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) दिलेले आहे. या कुलमुखत्यारपत्रानुसार माझ्यासाठी ते शिव्या खातील, असे ठरलेले आहे. अजूनही हे कुलमुखत्यारपत्र वैध आहे,’ असे मिश्किल भाष्य केले. कमलनाथ यांच्या या विधानालादेखील दिग्विजय सिंह यांनी तेवढ्याच तत्परतेने उत्तर दिले. “मी शिव्या खायला तयार आहे. मात्र चूक कोणाची आहे हे लोकांना समजले पाहिजे,” असे विधान सिंह यांनी केले. सिंह यांच्या या विधानानंतरही सभास्थानी हशा पिकला. त्यानंतर कमलनाथ यांनी ‘मी अगोदर म्हटल्याप्रमाणे आमच्यात फक्त राजकीयच नव्हे तर कौटुंबिक संबंध आहेत,’ असे विधान केले. शेवटी ‘कमलनाथ यांना म्हणायचे आहे की, भगवान शिवाचे काम हे विष पिण्याचे आहे. ठिक आहे मी विष प्यायला तयार आहे,’ असे दिग्विजय सिंह म्हणाले.

व्हिडीओ शेअर करत भाजपाची काँग्रेसवर टीका

याच संभाषणाचा आधार घेत भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसमध्ये काहीही आलबेल नाही, असे भाजपाने म्हटले आहे. ‘काँग्रेसमध्ये कपडे फाडण्याची स्पर्धा लागली आहे,’ असे म्हणत भाजपाने या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

दिग्विजय सिंह यांनी केला व्हिडीओ शेअर

भाजपाच्या या व्हिडीओनंतर दिग्विजय यांनी लगेच मूळ व्हिडीओ शेअर केला. “कमलनाथ आणि माझ्यात कौटुंबिक संबंध आहेत. हे संबंध १९८० सालापासून आहेत. आमच्यात अनेकवेळा मतभेद झाले. दोन मित्रांची वेगवेगळी मते असणे स्वाभाविक आहे. मात्र आमच्यात मनभेद नाही,” असे कॅप्शन देत दिग्विजय सिंह यांनी सभेतील संभाषणाचा व्हिडीओ एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केला.

हेही वाचा : ‘काँग्रेस घराणेशाहीवर चालणारा पक्ष, भारतात ओबामांसारखा नेता होणे अशक्य’; शशी थरूर यांचे राहुल गांधीबाबत मोठे विधान

कमलनाथ यांचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, काँग्रेसचे नेते रविंद्र रघुवंशी यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. रघुवंशी यांच्या समर्थकांनी कमलनाथ यांच्या घेराव घालत घोषणाबाजी केली. त्यानंतर रघुवंशी यांच्या समर्थकांशी बोलताना ‘दिग्विजय सिंह यांच्याकडेच तिकीट वाटपाची जबादारी होती. त्यामुळे त्यांच्याकडे जा आणि त्यांच्यासह त्यांचे पुत्र (जयवर्धन सिंह) यांचे कपडे फाडा आणि मी असे म्हणालो आहे, हे त्यांना सांगू नका,’ असे कमलनाथ म्हणाले होते. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर दिग्विजय आणि कमलनाथ यांच्यात नाराजी आहे, असा दावा केला जात होता. काँग्रेस मात्र या दोन्ही नेत्यांत कोणतीही नाराजी नाही, असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh assembly election 2023 update bjp alleges congress have internal clash share digvijay singh and kamal nath video prd