मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेससह भाजपाच्या प्रचारालाही वेग येत आहे. येथे सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात आहेत. या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रस्थानी ठेवूनच प्रचार केला जात आहे. विशेष म्हणजे भाजपाने यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. म्हणजेच मोदी यांनी केलेल्या कामाचा आधार घेत, मध्य प्रदेशच्या जनतेकडे मते मागितली जात आहेत. याच प्रचाराचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला एक खुले पत्र लिहिले आहे. भाजपाचे कार्यकर्ते हे पत्र प्रत्येक घराघरांत घेऊन जाणार असून, पत्राच्या माध्यमातून मोदी यांचा संदेश लोकांना सांगितला जाणार आहे.
मोदींच्या नावाने भाजपाची नवी टॅगलाईन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला खुले पत्र लिहिले आहे. या पत्राला भाजपाने ‘मोदीजी की चिठ्ठी’ असे म्हटले आहे. भाजपाचे कार्यकर्ते हे पत्र मध्य प्रदेशमधील प्रत्येक मतदारापर्यंत घेऊन जाणार आहेत. भाजपाने नुकतेच ‘मध्य प्रदेश के मन में मोदी’ नावाची टॅगलाइन सार्वजनिक केली आहे. या टॅगलाइनच्या माध्यमातून मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत मोदी हेच केंद्रस्थानी कसे राहतील याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे.
नरेंद्र मोदी यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम
नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले पत्र मध्य प्रदेशमधील एकूण ६४ हजार ५२३ पोलिंग बूथमधील मतदारांना वाटले जाणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही मोहीम राबवली जाणार असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये एकूण नऊ सभा घेतल्या होत्या. या निवडणुकीत मोदींच्या नऊपेक्षा अधिक सभा होण्याची शक्यता आहे.
भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात
मध्य प्रदेशमध्ये गेल्या २० वर्षांत झालेल्या विकासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मोदी यांनी या पत्राच्या माध्यमातून केला आहे. तसेच डबल इंजिन सरकारचे महत्त्व पटवून देण्याचाही प्रयत्न मोदी यांनी केला आहे. सध्या येथे भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मध्य प्रदेशमध्ये भाजपामध्ये सर्वोच्च समजले जाणारे शिवराजसिंह चौहान हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असा तर्क लावला जात होता. मात्र, भाजपाने अद्याप यावर कोणतेही भाष्य न केल्यामुळे शिवराजसिंह चौहान यांचे काय होणार? भाजपा यावेळी मुख्यमंत्रिपदाची संधी अन्य नेत्याला देणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
“मध्य प्रदेशमध्ये भाजपा-मोदी यांचेच सरकार यायला हवे”
भाजपा मध्य प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव वापरून प्रचार करीत आहे. मध्य प्रदेश भाजपाने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ‘मोदी-भाजपा’ सरकारला निवडून द्यावे, असे थेट आवाहन भाजपाने जनतेला केले आहे. “मध्य प्रदेशमध्ये भाजपा-मोदी यांचे सरकार यायला हवे. आपण सर्व जण मिळून त्यांना विजयी करू. मोदी-भाजपा सरकार आल्यामुळे सर्वांचे जीवन प्रकाशमान होईल,” असा संदेश या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
“लोक नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवतात”
मध्य प्रदेशमधील सर्व नेत्यांच्या तुलनेत मोदी हेच सर्वोच्च आणि प्रमुख आहेत, असे ठसवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. याबाबत भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम आणि त्यांचे नाव याचा शक्य तितका वापर करून घेण्याचा प्रयत्न होत आहे. कारण- लोक मोदींवर विश्वास ठेवतात. मोदींमुळे लोक जास्त प्रभावीत होतात. मोदींनी मध्य प्रदेश राज्याची एखाद्या पालकाप्रमाणे काळजी घेतलेली आहे,” अशी प्रतिक्रिया त्रिपाठी यांनी दिली.
लोकांचे लक्ष विचलित करण्याचा भाजपाकडून प्रयत्न : काँग्रेस
मध्य प्रदेशमध्ये प्रचार करताना भाजपाकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना केली जात आहे. त्यावर बोलताना “मनमोहन सिंग यांनी मध्य प्रदेशकडे दुर्लक्ष केलेले आहे,” अशी प्रतिक्रिया त्रिपाठी यांनी दिली. काँग्रेसने मात्र भाजपाच्या या रणनीतीवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा यांनी, “भाजपाचा हा प्रचार म्हणजे लोकांना अडकवण्यासाठीचा सापळा आहे”, असे विधान केले आहे. “१८ वर्षांपासून शिवराजसिंह चौहान करीत असलेली गैरकृत्ये समोर आली आहेत. याच कारणामुळे लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. आम्ही मात्र शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारच्या कामगिरीवरच टीका करणार आहोत. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोदींवर बोलू,” असे मिश्रा म्हणाले.