मध्य प्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री नरेंद्र शिवाजी पटेल यांचा मुलगा अभिज्ञान पटेल याने एका जोडप्याला आणि पत्रकाराला मारहाण केली. हा प्रकार भोपाळमधील गुलमोहर भागात घडला. लोकसभा निवडणुकीच्या आधी हा प्रकार घडल्यामुळे मध्य प्रदेश भाजपा अडचणीत आली आहे. पक्षश्रेष्ठींनीदेखील या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. हे प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून मध्य प्रदेश भाजपा परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. बुधवारी पोलिसांनी मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मंत्री नरेंद्र शिवाजी पटेल यांचा मुलगा अभिज्ञान पटेल याला काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास सांगितले; परंतु अभिज्ञान याने पोलिसांशी वाद घातला.
“कारवाई सुरू झाली आहे. मंत्र्यांच्या मुलाने अद्याप कागदपत्रांवर स्वाक्षरी केलेली नाही. आम्ही (पीडितांच्या) वैद्यकीय अहवालांची वाट पाहत आहोत,” असे भोपाळमधील हबीबगंजचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) मयूर खंडेलवाल यांनी सांगितले. या घटनेनंतर मध्य प्रदेश भाजपातील नेतेमंडळींनीही मंत्री नरेंद्र पटेल यांना फटकारले. राज्य भाजपाचे प्रमुख व्ही. डी. शर्मा यांनी मंत्र्यांना सावध केले आणि सांगितले, “कोणालाही गुंडगिरी करण्याचा अधिकार नाही.” शर्मा यांनी मंत्री नरेंद्र पटेल यांना फटकारल्याच्या वृत्ताला दुजोरा देत, पक्षाच्या एका नेत्याने सांगितले, “राज्यप्रमुखांनी मंत्र्याला सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे आणि भविष्यात अशा घटनांमध्ये न पडण्याचादेखील सल्ला दिला आहे.”
नेमके प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यमंत्री पटेल यांचा मुलगा अभिज्ञान पटेल हे त्रिलंगा परिसरात चारचाकी वाहनाने फिरत होते. शहरातील एका क्रॉसिंगजवळ अभिज्ञान यांचा एका पत्रकाराशी वाद झाला. अभिज्ञान आणि त्याच्याबरोबर असलेल्या मुलांनी पत्रकाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण होताना पाहून जवळच्या रेस्टॉरंटचे मालक व त्यांच्या पत्नी बाहेर आल्या आणि त्यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी त्या दाम्पत्यालाही मारहाण केली. मारहाणीची तक्रार देण्यासाठी रेस्टॉरंटचे मालक पोलिस ठाण्यात पोहोचले. अभिज्ञानने त्यांचा पाठलाग केला आणि पोलिस ठाण्यातदेखील वाद घातला. यादरम्यान अभिज्ञान यांची पोलिस कर्मचार्यांशी हाणामारी झाली; ज्यात अभिज्ञानलाही दुखापत झाली
पक्षाच्या प्रतिमेला धक्का
या प्रकरणावर काँग्रेसने जोरदार टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी या घटनेनंतर अभिज्ञानला मारहाण केल्याप्रकरणी चार पोलिसांना निलंबित केल्यावरून भाजपा सरकारला फटकारले आहे. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, या घटनेने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. “गेल्या काही काळापासून वडिलांच्या कार्यात पुढाकार घेणारा मंत्र्याचा मुलगा निशाण्यावर आहे. मंत्र्यांनी लक्ष वेधून न घेता काम करावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. या घटनेमुळे पिता-पुत्र दोघांनाही नकारात्मक परिणामांचा सामना करावा लागेल.” भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाने क्रिकेटच्या बॅटने अधिकाऱ्याला मारहाण केली होती. त्या प्रकरणात पंतप्रधानांना स्वतः हस्तक्षेप करावा लागला होता, असेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री नरेंद्र पटेल कोण आहेत?
होशंगाबाद जिल्ह्यातील सेमारी ताला येथील मूळ रहिवासी पटेल हे मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य राज्यमंत्री आहेत. उदयपुरामधून ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या देवेंद्र सिंग पटेल यांचा ४२ हजारहून अधिक मतांनी पराभव केला.
पटेल लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. त्यांचे वडील भाजपाचे सक्रिय सदस्य होते. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत पटेल यांनी भाजपासाठी मतदान प्रतिनिधी म्हणून काम केले होते आणि नंतर ते जिल्हा उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचले. ते समाजातल्या अस्पृश्यता निर्मूलनासाठीही कार्य करीत आहेत. त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पटेल यांनी विदिशा येथून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. रायसेन जिल्ह्यातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांना लेखनाचीही आवड आहे.