कर्नाटकची निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेश राज्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची असा चंग काँग्रेसने बांधला असून त्यासाठी तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. १२ जून रोजी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी जबलपूर येथे सभेला संबोधित करत या मोहिमेचा श्रीगणेशा केला आहे. दरम्यान प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशमधील शिवराजसिंह चौहान सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. चौहान यांच्या काळात तीन वर्षांमध्ये फक्त २१ जणांना सरकारी नोकरी मिळाली आहे, असा मोठा दावा प्रियांका गांधी यांनी केला आहे. याच कारणामुळे येथे भाजपा आणि काँग्रेस पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका गांधी नेमके काय म्हणाल्या?

“मागील तीन वर्षांत मध्य प्रदेश सरकारने फक्त २१ जणांना सरकारी नोकरी दिली आहे. हे सत्य समोर आल्यानंतर मी आश्चर्यचकित झाले. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही बाब तीन वेळा तपासण्यास सांगितली. मात्र सत्य बदलले नाही,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या. मध्यप्रदेश विधिमंडळ अधिवशेनादरम्यान क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री यशोधरा राजे सिंधिया यांनी विरोधकांच्या प्रश्नाला लेखी उत्तर दिले होते. या पत्राचा आधार घेत प्रियांका गांधी यांनी वरील दावा केला आहे.

हेही वाचा >>> मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्ये काबीज करण्यासाठी भाजपाचा ‘मेगा प्लॅन’, उभी केली तीन हजार कार्यकर्त्यांची फौज!

प्रियांका गांधी यांचा दावा भाजपाने फेटाळला

प्रियांका गांधी यांच्या या दाव्यानंतर मध्य प्रदेशच्या राजकाणात एकच खळबळ उडाली. भाजपाने प्रियांका गांधी यांचा दावा फेटाळून लावला आहे. ‘प्रियांका गांधी यांनी दिलेली माहिती खोटी आहे. सरकारी आकड्यानुसार मागील तीन वर्षात मध्य प्रदेश सरकारने एकूण ६१ हजार सरकारी नोकऱ्या दिलेल्या आहेत. तसेच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती मिळालेल्यांची संख्या यामध्ये जोडल्यास हा आकडा आणखी मोठा होतो,’ असे मत भाजपाने मांडले आहे.

अधिवेशनात काँग्रेसने कोणता मुद्दा उपस्थित केला होता?

मार्च महिन्यात सांगता झालेल्या अधिवेशनात काँग्रेसचे आमदार मेवाराम जाटव यांनी सरकारला रोजगारासंदर्भात प्रश्न विचारले होते. याबाबत त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला अधिक माहिती दिली. “सरकारने आतापर्यंत किती तरुणांना सरकारीन नोकऱ्या दिल्या, असा प्रश्न मी विचारला होता. सध्या राज्यात बेरोजगारी हा सर्वांत महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा बनला आहे. ते रोजगारासंदर्भात मोठे दावे करत होते. याबाबत सरकारने लेखी उत्तर द्यावे, अशी मी मागणी केली होती. मात्र यातून धक्कादायक सत्य समोर आले,” असे जाटव यांनी सांगितले.

हेही वाचा >>> के. चंद्रशेखर राव यांच्या राज्यातील पक्षविस्ताराची प्रस्थापितांना चिंता

२ लाख ५१ हजार ५७७ तरुणांना दिले नियुक्तीपत्र

जाटव यांनी विचारलेल्या प्रश्नाला १ मार्च रोजी सकारने लेखी उत्तर दिले. या उत्तरात “१ एप्रिल २०२० पासून सरकारने २१ उमेदवारांना शासकीय आणि निमशासकीय सेवेत सामावून घेतले आहे. याव्यतिरिक्त खासगी क्षेत्रात नोकरी म्हणून साधारण २ लाख ५१ हजार ५७७ तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. साधारण ३० लाख ९३ हजार १४९ (३७ लाख ८० हजार ६७९ शिक्षित, १ लाख १२ हजार ४७० अशिक्षित) लोकांनी रोजगार कार्यालयात नोंदणी केलेली आहे. रोजगार कार्यालये चालवण्यासाठी राज्य सरकारने २०२१-२०२२ या वर्षात १ हजार ६७४ रुपये खर्च केलेले आहेत,” अशी माहिती सरकारने दिली.

हेही वाचा >>> लवकरच ८० जातींचा केंद्राच्या ओबीसी यादीत समावेश, प्रक्रियेला सुरुवात!

प्रियांका गांधी यांच्या दाव्यानंतर क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री यशोधरा राजे सिंधिया यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या उपलब्ध नव्हत्या. असे असले तरी काँग्रेसचा दावा चुकीचा आहे, असे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. “त्या राज्याच्या रोजगार कार्यालयात सरकारी नोकरी मिळालेल्या तरुणांची आकडेवारी सांगत आहेत. मात्र रोजगार मिळालेल्या एकूण लोकांची संख्या ही ६१ हजार एवढी आहे,” असे शासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

प्रियांका गांधींनी २१ आकडा कोठून आणला?

भाजपा प्रवक्त्यानेही प्रियांका गांधी यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. “आतापर्यंत ३८ हजार नोकऱ्या या शिक्षण क्षेत्रात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रियांका गांधी यांना २१ हा आकडा कोठून मिळाला. ते करत असलेले सर्व दावे खोटे आहेत. या दाव्यांमुळे त्यांचीच प्रतिमा मलीन होईल. त्यांनी यापुढे तथ्य असलेली आकडेवारी सादर करायला हवी,” असे भाजपाचे प्रवक्ते म्हणाले.

६० हजार नोकऱ्या निर्माण करण्यात आल्या असतील तर त्या कोठे आहेत?

भाजपाच्या टीकेला पुढे काँग्रेसनेही जशास तसे उत्तर दिले आहे. “भाजपा आम्ही नोकऱ्या दिल्याचा दावा करत आहेत. मात्र या फक्त घोषणाच आहेत. खरं पाहता या नोकऱ्या अस्तित्वातच नाहीत. ६० हजार नोकऱ्या निर्माण करण्यात आल्या असतील तर सरकारने याबाबत सांगायला हवे,” अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते पियुष बाबेले यांनी केली.

हेही वाचा >>> भाजपा वापरणार काँग्रेसचा ‘कर्नाटक पॅटर्न’? राजस्थान जिंकण्यासाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी!

१० हजार २९८ विद्यार्थ्यांनी तसेच ६९९९ बेरोजगार तरुणांनी केली आत्महत्या

काँग्रेस पक्ष मध्य प्रदेशमध्ये भाजपापुढे मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्षाकडून सातत्याने बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यासह काँग्रेस पक्ष तरुण आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचाही प्रश्न उपस्थित करत आहे. भाजपा सरकारच्या काळात १० हजार २९८ विद्यार्थ्यांनी तसेच ६९९९ बेरोजगार तरुणांनी आत्महत्या केलेली आहे, असा दावा काँग्रेसकडून केला जातोय.

तरुणांना कमवा आणि शिका माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न

बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा मध्य प्रदेश सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. सरकारकडून कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार दिला जात आहे. या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण झालेले आहे, त्यांना ८ हजार रुपये भत्ता, ज्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून डिप्लोमा मिळवलेला आहे त्यांना ८५०० रुपये, पदविका असलेल्या तरुणांना ९ हजार रुपये तसेच ज्यांनी पदवी मिळवलेली आहे त्यांना १० हजार रुपये प्रतिमहिना भत्ता देण्यात येत आहे.

हेही वाचा >>>“सुडाचे दुसरे नाव म्हणजे मोदी!” नेहरूंचे १६ वर्षे वास्तव्य असलेल्या वास्तूचे नाव बदलल्यामुळे काँग्रेस आक्रमक, भाजपावर सडकून टीका

१५ ऑगस्टपर्यंत १ लाख रिक्त जागा भरणार

यासह शिवराजसिंह चौहान यानी १५ ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या विभागातील १ लाख रिक्त जागा भरण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस पक्ष भाजपाविरोधात कसा लढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh cm shivraj singh chauhan government provided only 21 government jobs claims priyanka gandhi bjp criticzes prd