मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. बहुमताचा आकडा पार करत भाजपाने येथे सरकार स्थापन केले आहे. निवडणुकीआधी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचाच विजय होईल, असे भाकित केले जात होते. मात्र मतमोजणीच्या दिवशी प्रत्येकालाच धक्का बसला. दरम्यान या पराभवानंतर आता मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जितू पटवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पटवारी यांच्यावर बुलडोझरने पुष्पवृष्टी
मंगळवारी जितू पटवारी यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वाकारण्याआधी पटवारी यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते पटवारी यांच्या नावाचा जयघोष करताना दिसत होते. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी पटवारी यांच्यावर बुलडोझरच्या मदतीने पुष्पवृष्टी केली. आता काँग्रेस पक्षामध्ये कमलनाथ यांचा काळ गेला असून तरुणांचा काळ आला आहे, असेच चित्र या शक्तीप्रदर्शनातून दिसत होते.
मध्य प्रदेशमध्ये खांदेपालट
मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असला तरी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरून नव्याने तयारीला लागणे गरजेचे आहे, हे ओळखून काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये हा निर्णय घेतला आहे. आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्याची जबाबदारी पटवारी यांच्यावर असणार आहे.
“आगामी काळात अनेक बदल होणार”
पक्षाच्या भोपाळमधील मुख्यालयात काही पोस्टर्स लावण्यात आली होती. या पोस्टर्समधूनही आता काँग्रेसमध्ये तरुणांचा काळ सुरू झाला, आहे असाच संदेश देण्यात आला होता. यातील एका पोस्टरवर ‘युवा जोश, युवा आगाझ’ असे लिहिलेले होते. पटवारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या यात्रेत नंतर विरोधी पक्षनेते आणि आदिवासी समाजाचे फायरब्रँड नेते उमंग सिंघार तसेच हेमंत कटारे या नेत्यांनीही आपला सहभाग नोंदवला. पटवारी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली. “काँग्रेस पक्षात आगामी काळात अनेक बदल होणार आहेत. सध्या थोडी वाट पाहावी लागेल. पक्षातील जुन्या नेत्यांना पूर्णपणे वेगळे करता येणार नाही. कारण त्यांचे मार्गदर्शन पक्षाला गरजेचे आहे,” असे या नेत्याने म्हटले.
“हा बदल अगोदरच करायला हवा होता “
काँग्रेसच्या एका तरुण नेत्याने काँग्रेसमध्ये आता झालेला बदल अगोदरच व्हायला हवा होता,अशी प्रतिक्रिया दिली. “पक्षाने हा बदल काही महिन्यांआधीच करायला हवा होता. आता मात्र आमच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढणारा नेता आला आहे. आमच्यासोबत अश्रूधुरांचा, लाटीमार यांचा सामना करणाऱ्या नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे,” अशी भावना या तरुण नेत्याने व्यक्त केली.
“…तर दोन लाख लोकांची रॅली काढू”
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर या यात्रेदरम्यान पटवारी यांनी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले. “जानेवारी महिन्यापर्यंत भाजपाने आपली आश्वासनं पूर्ण न केल्यास आम्ही दोन लाख लोकांची एक रॅली काढू. या यात्रेच्या माध्यमातून भाजपाला त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली जाईल. आता शिवराजसिंह चौहान गेले आहेत. जितू भैय्या आले आहेत,” असे जितू पटवारी म्हणाले.
“खचून जाण्याची गरज नाही, आता…”
“आता घाबरण्याची किंवा निराश होण्याची हगरज नाही. लोकशाहीत पराभव आणि विजय होतच असतो. आता विरोधक म्हणून काय करायला हवे, हे आपण शोधले पाहिजे. आपला पराभव झाला असेल पण पराभवातूनच मोठ्या यशाची निर्मिती होते. आता आपल्यासमोर लोकसभा निवडणुकीचे आव्हान आहे. भाजपाच्या कुशासनाची माहिती लोकांना देणे हेदेखील आपल्यासमोरचे आव्हान आहे. पराभवाने खचून जाण्याची गरज नाही,” असे पटवारी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश येणार?
दरम्यान, काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये तरुण नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवल्यामुळे आगामी काळात पक्षात काय बदल होणार, पटवारी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.