काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. कमलनाथ यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र नकुलनाथ हेदेखील भाजपात जाणार असल्याचे सांगण्यात येते होते. मात्र, त्यानंतर कमलनाथ यांनी स्वत: याबाबत खुलासा करत ही अफवा असून यात कोणतेही तथ्य नाही, असे सांगितले होते. यावेळी काँग्रेस आपल्या नेत्यांना सांभाळू शकत नाही, असे आरोपही विरोधकांकडून करण्यात येत होते.
अशातच आता कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ हे शनिवारी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झाल्याचे बघायला मिळालं आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी काँग्रेचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते अध्यक्ष जितू पटवारीदेखील उपस्थित होते. त्यामुळे मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
हेही वाचा – पीएम मोदींच्या भेटीपूर्वीच ओडिशामध्ये राजकीय चर्चांना उधाण; बीजेडी-भाजपा पुन्हा युती होणार का?
”कमलनाथ यांचा भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग”
दरम्यान, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी राजस्थानच्या ढोलपूर येथून मध्य प्रदेशातील मुरैना येथे दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांचा रोडशोदेखील पार पडला. तसेच त्यांनी दुपारी ३ वाजता एका सभेलादेखील संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ तसेच ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारीदेखील उपस्थित होते.
”येणारी निवडणूक पुढच्या पिढीचे भविष्य ठरवणारी”
यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले, “येत्या काही दिवसांत निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक साधारण निवडणूक नाही, तर ही निवडणूक तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे भविष्य ठरवणारी आहे. राहुल गांधी यांची मध्य प्रदेशातील ही दुसरी यात्रा आहे. या यात्रेद्वारे प्रेम पसरवण्याचे काम राहुल गांधी करत आहेत, ही आपल्या देशाची संस्कृती आहे. आपल्या पुढच्या पिढीचे भवितव्य सुरक्षित व्हावे, यासाठी राहुल गांधी काम करत आहेत.
दिग्गज नेते राहुल गांधींच्या रोडशोमध्ये सहभागी
महत्त्वाचे म्हणजे मुरैना येथील सभेनंतर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा संध्याकाळी ग्वाल्हेर येथे दाखल झाली. यावेळीही कमलनाथ आणि दिग्विजय सिंग हे राहुल गांधी यांच्या रोडशोमध्ये सहभागी झाले होते. या रोड शोदरम्यान राहुल गांधींनी जनतेशी संवादही साधला. ”आज भारतातील प्रमुख कंपन्यांमध्ये मालकांमध्ये ओबीसींची संख्या खूप कमी आहे. याशिवाय मीडिया, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातही ओबीसींना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत नाही, त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही जाती आधारित जनगणना करू, त्यानुसार सामाजिक न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
हेही वाचा – योगी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; कोणाला संधी मिळणार?
पंतप्रधान मोदींवर केली टीका
यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. पंतप्रधान मोदी म्हणतात की, ते गरीब आणि मागासवर्गीयांसाठी राजकारण करतात. मात्र, आज देशातील ७२ टक्के समाज मागावर्गीय आहे. त्यांना त्यांचे अधिकार मिळत नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदी कोणत्या प्रकारचे राजकारण करतात, असा प्रश्न त्यांनी विचारला.
पुढे बोलताना त्यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरूनही पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं. ”देशात आज बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारतात सर्वाधिक बरोजगार युवक आहेत. नोटबंदी आणि जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे छोटे व्यवसाय बंद पडले”, असे ते म्हणाले.