भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय ‘इंदौर-१’ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून ते जिंकले वा हरले तरी दिल्लीऐवजी भोपाळ व इंदौरमध्ये त्यांना मन रमवावे लागेल असे दिसते. ‘आमचे नेते पुन्हा मुख्यप्रवाहात आले असून आता इंदौरचा विकास वेगाने होईल’, असे विजयवर्गीय यांच्या महावीर बागेतील निवडणूक कार्यालयात जमलेल्या समर्थकांचे म्हणणे होते. खरेतर ‘घरवापसी’मुळे कैलाश विजयवर्गीयांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१८ मध्ये ‘इंदौर-१’मधून काँग्रेसचे संजय शुक्ला विजयी झाले होते, त्यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवला आहे. करोनाच्या काळात संजय शुक्ला यांनी कैलाश विजयवर्गीय यांचे भरभरून कौतुक केले होते. संबंधित चित्रफीत विजयवर्गीयांचे समर्थक लोकांना दाखवत असून शुक्ला हे विजयवर्गीयांना खूप मान देतात. आता राजकीय कारणांमुळे शुक्लांना विजयवर्गीयांविरोधात लढावे लागत असल्याचे या समर्थकांचे म्हणणे आहे. ‘कैलाश विजयवर्गीय हे देवता असून करोनाच्या काळात अविश्रांत काम केले होते. त्यामुळे इंदौरची जनता त्यांचा सन्मान करते’, असे समर्थकांच्या घोळक्यातील कार्यकर्त्याने सांगितले.

कैलाश विजयवर्गीय यांचे समर्थक स्तुती करत असले तरी, काँग्रेसने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उमेदवारी अर्ज भरताना विजयवर्गीय यांनी त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. प्रसिद्धी चांगली वा वाईट नसते, लोकांच्या नजरेत राहणे महत्त्वाचे असते, असे अनेक नेत्यांना वाटते. अशा नेत्यांमध्ये विजयवर्गीय यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या तक्रारींकडे फारसे लक्ष दिलेले नाही. ‘लोकांमध्ये विजयवर्गीयांबद्दल फारसे चांगले मत नसले तरी, त्यांच्याकडे दाम आणि दंड अशी दोन्ही ताकद आहे’, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… श्रीपतराव शिंदे यांच्या पश्चात जनता दलासमोर गडहिंग्लजचा गड राखण्याचे आव्हान

भाजपने तीन केंद्रीयमंत्री आणि खासदारांसह कैलाश विजयवर्गीय यांच्यासारख्या ‘दिग्गज’ नेत्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवले आहे. सुमारे दहा वर्षांच्या कालावधीनंतर विजयवर्गीय पुन्हा राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले आहेत. विजयवर्गीयांना राज्यामध्ये परत येण्याची इच्छा नव्हती. त्यांचा राजकीय वारसदार मुलगा आकाश याची ‘बॅटमॅन’ अशी बदनामी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या नजरेतून विजयवर्गीय उतरल्याची चर्चा दिल्लीतही रंगली होती. आकाशने महापालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर या गुंडगिरीची दखल मोदींनी घेतली होती. भाजपने आकाशला उमेदवारी नाकारून वडील कैलाश विजयवर्गीय यांना राज्यात परत पाठवले. ‘माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने विधानसभा निवडणूक लढवायची का? मी लोकांपुढे हात जोडून मते मागू का?’, असे म्हणत विजयवर्गीयांनी उद्विग्नता व्यक्त केली होती. त्यावरून काँग्रेसचे नेते विजयवर्गीय यांची खिल्ली उडवत आहेत. ‘मते मागायला गेल्यावर हात न जोडणारा नेता लोकांच्या किती उपयोगी पडेल?’, असा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. पण, ‘विजयवर्गीय यांनी हे विधान गमतीने केले होते, त्याचा काँग्रेसने चुकीचा अर्थ काढला’, अशी सारवासारव भाजपच्या कार्यकर्त्याने केली.

वास्तविक, ‘इंदौर-२’ मतदारसंघ हा विजयवर्गीय यांचा बालेकिल्ला. पण, ते ‘इंदौर-१’मधून निवडणूक लढवत आहेत. वैश्य समाजातील विजयवर्गीय हे भाजपचे नेते असल्यामुळे ब्राह्मण आणि यादव या समाजाचाही पाठिंबा मिळतो. ‘इंदौर-१’मध्ये संजय शुक्ला हे स्थानिक ब्राह्मण उमेदवार असले तरी विजयवर्गीय यांच्या उमेदवारीमुळे जातीचे समीकरणाची शुक्लांना नव्याने मांडणी करावी लागली आहे. २०१८ मध्ये ते ८ हजार मताधिक्याने विजयी झाले होते. ‘शुक्लांचा इंदौर-१ मध्ये दांडगा जनसंपर्क आहे. इथल्या मतदारांना त्यांनी अयोध्येपासून अनेक तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी पाठवले होते. या भागातील रहिवासी असल्याने लोक त्यांना कधीही भेटू शकतात’, असे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते ओम बन्सल यांचे म्हणणे होते. विजयवर्गीय इंदौरचे महापौर होते. याच शहरातून राजकीय कारकीर्द उभी केली. मग, ‘मी परका कसा?’, असा प्रतिप्रश्न विजयवर्गीय करत आहेत.

‘देशातील तरुण शिक्षणासाठी पुणे वा बेंगळुरूला जातात, ते इंदौरला का येत नाहीत? इंदौर हे शैक्षणिक केंद्र बनले पाहिजे. इंदौरमध्ये आरोग्य पर्यटनाचे क्षेत्र विकसीत केले पाहिजे’, असे स्थानिक मुद्दे विजयवर्गीय मांडत आहेत. आता ते राम मंदिर आणि इस्रायल-हमास वगैरे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्दे प्रचारात उपस्थित करत आहेत. स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर, ‘कुठलाही मुद्दा महत्त्वाचा असतो. काँग्रेसकडून भाजपविरोधात किरकोळ मुद्दा मांडला जात असेल तर भाजपनेही सर्व मुद्दे प्रचारात आणले पाहिजेत’, असे कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले.

‘मी इथे फक्त आमदार होण्यासाठी आलो नाही. मला मोठे काम करू दाखवायचे आहे’, असे विजयवर्गीय यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होण्याचे वेध लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चांगले काम केले आहे. पण, ते २० वर्षे मुख्यमंत्री राहिले, आता दुसऱ्याला संधी दिली पाहिजे. विजयवर्गीय मुख्यमंत्री होऊ शकतील’, असा दावा त्यांचे पाठिराखे करत आहेत. ‘शिवराजसिंह यांचे नाव घेत नसले तरी, त्यांना जे जमले नाही ते आपल्याला करून दाखवता येईल’, असा विश्वास कैलाश विजयवर्गीय यांना वाटू लागला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh election bjp kailash vijayvargiya is eyeing the post of chief minister concentrating on bhopal and indore instead of delhi print politics news dvr