पक्षातील काही प्रमुख नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने मध्य प्रदेश काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी जबलपूरचे महापौर जगतसिंग अन्नू यांनी बुधवारी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. गेल्या महिन्यात अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. काँग्रेसने श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारल्यामुळे ते पक्षावर नाराज होते. हेच काँग्रेस सोडून भाजपामध्ये सामील होण्याचे कारण असल्याचे जगतसिंग अन्नू यांनी संगितले.
अन्नू यांनी भोपाळ येथील भाजपाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री मोहन यादव, राज्य भाजपाचे प्रमुख व्ही. डी. शर्मा, राज्याचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. १८ वर्षांत जबलपूरमध्ये काँग्रेसचे अन्नू हे पहिले महापौर होते. माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते विवेक तंखा यांच्याही ते जवळचे मानले जायचे.
जबलपूर क्षेत्रातील काँग्रेस विधानसभेच्या नऊ जागा कमी झाल्या आहेत. त्यापैकी बहुतांश जागा कमलनाथ यांचे निवासस्थान असेलल्या छिंदवाडा येथील आहेत. अन्नू आपल्या पक्षप्रवेशावर म्हणाले, “ज्या दिवसापासून काँग्रेसने प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला जाण्याचे आमंत्रण नाकारले तेव्हापासून ते दुखावले गेले होते.” ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणांवर आणि डबल इंजिन सरकारबरोबर मी जबलपूरचा महानगर म्हणून विकास करेन.”
गुनामध्येही माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे निष्ठावंत मानले जाणारे काँग्रेस नेते सुमेर सिंग यांनी अन्नू यांच्यासारखेच कारण देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सुमेर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “मी नेहमीच काँग्रेसबरोबर होतो. श्रीराम मंदिराच्या विषयाला ज्या पद्धतीने पक्षाद्वारे हाताळले गेले, त्यामुळे मी नाराज होतो. याच कारणामुळे मी पक्ष सोडला आहे. प्रभू श्रीराम आपले आराध्य दैवत आहेत. आपल्या देवाचा अनादर करणाऱ्या पक्षासोबत मी राहू शकत नाही.”
२०१०-२०१५ मध्ये गुना जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून सुमेर सिंग निवडून आले होते. बुधवारी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाही २०२० साली आपल्या निष्ठावंतांसह काँग्रेसमधून बाहेर पडले होते.
काँग्रेसचे इतर नेतेही भाजपात
अन्नू यांच्यासह इतरही नेते भाजपात सामील झाले. दिंडोरी जिल्हा पंचायत अध्यक्ष रुदेश परस्ते व उपाध्यक्ष अंजू जितेंद्र बेओहर, सिंगरौली जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अर्चना सिंह यांच्यासह इतर अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत महाकौशल प्रदेशातील सिहोरा मतदारसंघातील उमेदवार काँग्रेस नेत्या एकता ठाकूर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. १९ जानेवारी रोजी मुरैना येथील काँग्रेसचे माजी आमदार व सिंधिया यांचे विश्वासू मानले जाणारे राकेश मावई यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
जबलपूरचे महापौर म्हणून काही काँग्रेस नेत्यांसह शहरात काम करण्यात अन्नू यांना अडचणी येत होत्या. भाजपाने पक्षात येण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर अन्नू हे मुख्यमंत्री यादव यांच्यासह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह दिसले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गेल्या महिन्यात जबलपूर दौऱ्यातही अन्नू यांची उपस्थिती होती. “राम मंदिराच्या कार्यक्रमापूर्वी अन्नू यांनी सर्व नगरसेवकांना अयोध्येला नेण्याचे आश्वासन दिले. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जबलपूरमध्ये काय तयारी झाली आहे, याची शहानिशाही त्यांनी केली,” असे त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.
या कृतीमुळे प्रदेश काँग्रेसही थक्क झाली होती. प्रवक्ते के. के. मिश्रा यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी जगतसिंग अन्नू काँग्रेसमधून बाहेर पडल्याने पक्षकार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. ते म्हणाले, “भाजपाचा हा आणखी एक विजय आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत न जिंकलेली छिंदवाडा ही एकमेव जागा जिंकण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.”
भोपाळच्या कार्यक्रमात अन्नू आणि इतर काँग्रेस नेत्यांचे भाजपामध्ये स्वागत करताना मुख्यमंत्री यादव म्हणाले, “भाजपा परिवार वाढत आहे. पक्षात सामील होण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांची यादीही वाढत आहे.” ते म्हणाले, “ज्यांनी आज भाजपाचे सदस्यत्व घेतले, ते काँग्रेसवर नाराज आहेत. कारण- काँग्रेसमध्ये घराणेशाहीला महत्त्व दिले जाते. भाजपामध्ये सामूहिक नेतृत्वामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यालाही सन्मान मिळतो. या सर्व नेत्यांना आता पंतप्रधान मोदींच्या धोरणांना अनुसरून आपापल्या क्षेत्राचा विकास करायचा आहे.”
हेही वाचा : मनी लाँडरिंगप्रकरणी काँग्रेस नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी
व्ही. डी. शर्मा म्हणाले, “महाकौशल प्रदेश काँग्रेसमुक्त होत आहे. आता काँग्रेसच्याही मनात मोदी आहेत.” ते म्हणाले, “आज जबलपूर ते दिंडोरीपर्यंतचे नेते पक्षात दाखल झाले आहेत. सर्वांना सन्मानाने काम करण्याची संधी मिळेल याची मी खात्री देतो. राज्यातील लोकसभेच्या सर्व २९ जागा आम्ही जिंकू.”