यवतमाळ : महायुतीने जिल्ह्यातील पाच मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. महाविकास आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना शिवसेना उबाठाने वणी आणि दिग्रस मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली. काँग्रेसने अखेर आज शनिवारी यवतमाळ, राळेगाव, आर्णी व उमरखेड येथील उमेदवार जाहीर केल्याने बहुतांश मतदारसंघात दुहेरी लढत होईल, असे दिसते.

काँग्रेसने यवतमाळ येथे बाळासाहेब मांगुळकर यांना उमेदवारी दिली. राळेगावमधून माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांना तर आर्णी मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव जितेंद मोघे यांना उमेदवारी दिली. उमरखेड मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यवतमाळमधून बाळासाहेब मांगुळकर २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकीटवर लढले होते. त्यावेळी केवळ दोन हजार २५३ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यावेळी काँग्रेसने मांगुळकर यांना पुन्हा संधी दिल्याने यवतमाळ मतदारसंघात भाजप विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. या लढतीने भाजपसमोर आव्हान निर्माण झाले. राळेगाव मतदारसंघात काँग्रेसने परंपरागत उमेदवार प्रा. वसंत पुरके यांना संधी दिल्याने या मतदारसंघातही भाजप विरूद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आर्णी मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप घोषित झाला नाही. भाजप येथील विद्यमान आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्याऐवजी शुक्रवारीच भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घेतलेले माजी आमदार राजू तोडसाम यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. आर्णीत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसने माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव जितेंद्र मोघे यांना उमेदवारी दिली. आर्णी तालुक्यात काँग्रेसमध्ये दोन गट असल्याने जितेंद्र मोघे यांच्यासमोर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. उमरखेडमध्येही भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. ही जागा महायुतीत रिपाई आवठले गटास सोडावी अशी मागणी आहे. मात्र जागा भाजपकडे राहिल्यास येथे विद्यमान आमदार नामदेव ससाणे यांच्याऐवजी माजी आमदार राजेंद्र नजरधणे यांना भाजप उमेदवारी देईल, अशी चर्चा आहे. काँग्रेसने येथे साहेबराव कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली. उमरखेडमध्येही काँग्रेसचे दोन गट आहे. साहेबराव कांबळे हे माजी शासकीय अधिकारी असून, मूळचे नांदेड जिल्ह्यातील असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये पक्षाने बाहेरचा उमेदवार लादल्याची भावना आहे. त्यामुळे येथे काँग्रेस कार्यकर्ते बंड करण्याची शक्यता आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठाने पवन जयस्वाल यांना महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या विरोधात उतरविले आहे. येथे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे मुलगा राहुल ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नीशील होते. मात्र पक्षाने त्यांना डावलल्याची भावना काँग्रेसमध्ये निर्माण झाल्याने या मतदारसंघातही महाविकास आघाडीत बंड होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत आता केवळ पुसद येथील जागेचा तिढा सुटायचा आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)ला सुटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ने येथे इंद्रनील नाईक यांना उमेदवारी दिली. त्यांचे मोठे बंधू ययाती नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)ची उमदेवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे.