महाविकास आघाडीतील वाद निवळला; चेन्निथला उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ वर; दोन दिवसांत जागावाटपाची घोषणा

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात गुरुवारी बैठकीत वाद झाला होता.

maha vikas aghadi solve seat sharing issue for maharashtra assembly election 2024
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शनिवारी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई : महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेला वाद निवळावा यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यानंतर वाद निवळल्याचे चेन्निथला आणि संजय राऊत यांनी जाहीर केले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात गुरुवारी बैठकीत वाद झाला होता. यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषदेत या वादाचे पडसाद उमटले व पटोले यांनी राऊत यांच्यावर टीका केली होती. जागावाटपाच्या चर्चेत पटोले नकोत, अशी शिवसेनेची भूमिका होती. हा वाद आणखी चिघळू नये म्हणून काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी संजय राऊत उपस्थित होते. या भेटीच्या वेळी चेन्निथला यांच्याबरोबर पटोले उपस्थित नव्हते. नसिम खान, भाई जगताप आदी या वेळी चेन्निथला यांच्या बरोबर होते. चेन्निथला यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. भेटीनंतर आघाडीत वाद असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. आपण संजय राऊत आणि नाना पटोले यांच्याशी बोललो असून दोन दिवसांत जागावाटपाची घोषणा करू असे चेन्निथला यांनी स्पष्ट केले.

विदर्भातील जागांवरून शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता. स्वत: उद्धव ठाकरे यांनी तुटेपर्यंत ताणू नये असा सल्ला दिला होता. या वादावर पडदा टाकण्यासाठी रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. भेटीविषयीची माहिती देताना चेन्निथला म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली.. त्यांची आणि महाविकास आघाडीची तब्येत ठीकठाक आहे. आमच्यात कोणतेही वाद नाही. मी नाना पटोले आणि संजय राऊत या दोघांशीही बोललो आहे. या वादात काहीच तथ्य नाही, आम्ही एकत्र आहोत. महाविकास आघाडीच्या बैठका सुरूच राहणार आहेत. आघाडीतील तीन्ही पक्ष एकत्र आहेत. आम्ही सर्व एकजूटीने भाजपाविरोधात लढून सत्तेतील भ्रष्ट सरकारला हद्दपार करून महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन करणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> मी निवडणूक ‌लढविणारच, संदीप नाईक यांची भूमिका

एकत्र बसून गुंता सोडविण्याची मानसिकता लागते संजय राऊत

लवकरात लवकर उमेदवार यादी जाहीर व्हावी अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर जागावाटपाची चर्चा पूर्ण करू. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकारणात एखाद्या जागेवरून चर्चा वाढत असते. शुक्रवारी दिवसभर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील आणि आम्ही चर्चेला बसलो होतो. राष्ट्रवादी आणि आमच्यातील बरेचसे पेच सुटले आहेत. शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता लागते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीनंतर : चेन्निथला

ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीला सक्षम बनविण्यासाठी काम करीत आहेत. त्यांचे मत विचारात घेऊनच आम्ही पुढे जाऊ आणि आम्ही मिळून एकत्र काम करणार आहोत, असे चेन्निथला म्हणाले. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत बोलताना चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच आम्ही पुन्हा एकत्र बसून कोण मुख्यमंत्री बनणार याचा निर्णय घेऊ. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळावे हेच आमचे उद्दिष्ट आहे. भ्रष्ट सरकारला हटविण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार असल्याचेही चेन्निथला यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maha vikas aghadi solve seat sharing issue for maharashtra assembly election 2024 print politics news zws

First published on: 20-10-2024 at 06:26 IST
Show comments