प्रबोध देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अकोला : जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या दोन्ही गटांसह भाजपच्या नेत्यांची एकसाथ ‘वज्रमूठ’ बांधली होती. बाजार समित्यांवर सहकार गटाच्या वर्चस्वासाठी महाविकास आघाडीसह भाजपनेही एकजूट होऊन विजय मिळवला. ऐरवी एकमेंकाच्या विरोधात उभे ठाकणारे हे नेते बाजार समित्यांमधील सत्तेसाठी सुरात-सूर मिळवत एकत्र आल्याचे चित्र होते.
राज्यात सत्ताधारी भाजप-शिवसेना विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाची महाविकास आघाडी असे चित्र आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही बाजूचे नेते परस्परांवर तोंडसुख घेत असतात. ‘मविआ’कडून विविध ठिकाणी ‘वज्रमूठ’ सभा घेऊन सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष होईल, असा अंदाज बांधल्या जात होता. त्यानुसार काही जिल्ह्यात ‘मविआ’ व भाजप-शिवसेनेत लढती देखील रंगल्या. अकोला जिल्ह्यात मात्र वेगळीच स्थिती होती. आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी सहकार पॅनलच्या नावाखाली राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, शिवसेना व ठाकरे गट एकत्र आले. त्यांच्या विरोधात वंचित आघाडीने पॅनल उतरवले होते. प्रमुख पक्षांविरोधात वंचित अशी लढत होती. त्यात अपवाद वगळता सहकार गटाने आपला दबदबा कायम राखला आहे.
अकोला बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपने एकत्र येत वंचितच्या पॅनलचा धुव्वा उडवला. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागांवर विजय मिळवला आहे. या बाजार समितीवर कै.वसंतराव धोत्रे गटाचे तब्बल चार दशकांपासून असलेले वर्चस्व कायम राखले. अकोट बाजार समितीमध्ये चार पॅनलमध्ये लढत होती. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलने १८ पैकी १५ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. ठाकरे गटाचे माजी आमदार संजय गावंडे यांना स्वत:ला पराभवाचा सामना कराव लागला. बार्शीटाकळीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपच्या सहकार पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला. वंचित आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या पॅनला केवळ तीन जागा मिळाल्या. मूर्तिजापूरमध्ये राष्ट्रवादीचे सुहास तिडके यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने १६ जागा जिंकत विरोधकांना धुळ चारली. याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपचा देखील सहकारामध्ये समावेश होता. बाळापूरमध्ये शेतकरी सहकार पॅनलमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचा समावेश होता. निवडणुकीत त्यांचेच वर्चस्व राहिले. पातूरमध्ये सुद्धा सहकार गटानेच प्राबल्य राखले. तेल्हारा बाजार समितीमध्ये मात्र वंचित आघाडीने प्रस्थापितांना धक्का दिला. ठाकरे गटाच्या मदतीने त्यांनी ताबा मिळवला आहे. अकोला जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर अनेक वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीने वर्चस्व आहे. यावेळी बाजार समित्यांच्या निवडणुकीत सहकार गटापुढे वंचितने आव्हान उभे केले. सहकार नेत्यांनी प्रमुख पक्षांना एकत्र करीत लढा दिला.
हेही वाचा >>>‘अमित शाह सपशेल अपयशी, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा,’ विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी
पकड घट्ट करण्याचे प्रयत्न
बाजार समित्यांमध्ये पकड घट्ट करण्यासाठी सहकार गटाच्या नेत्यांनी प्रमुख पक्षांच्या एकजुटतेची मोट बांधली. वंचित आघाडीने सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग करून बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत मतदार संघातून वंचितला मदत देखील झाली. मात्र, अपेक्षित यश मिळू शकले नाही.