BJP Delhi Manifesto : दिल्लीमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीसह भाजपा आणि काँग्रेसही स्पर्धेत आहेत. दरम्यान गेल्या २६ वर्षांपासून भाजपा आणि ११ वर्षांपासून काँग्रेस सत्तेत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष सत्ता मिळवण्यासाठी कडवी लढत देत आहेत. अशात यामध्ये भाजपाने जोरदार तयारी केली असून, आज त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्याचा तिसरा भाग प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जाहीरनाम्याचा तिसरा भाग प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५० हजार सरकारी नोकऱ्या

यावेळी अमित शाह यांनी गिग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच त्यांना १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देणार असल्याचेही म्हटले आहे. शाह यांनी दिलेल्या आश्वासनांमध्ये दिल्लीतील तरुणांना ५०००० सरकारी नोकऱ्या, अनधिकृत वसाहतींमध्ये विक्री, खरेदीचे आणि नवीन बांधकामास परवानगी, उत्तर प्रदेश व हरियाणा यांच्या भागीदारीत महाभारत कॉरिडॉर आणि गुजरातमधील साबरमती नदीकाठासारखा यमुना नदीकाठाची निर्मिती यांचा समावेश आहे.

भाजपासाठी निवडणुका जनसंपर्काचे माध्यम

भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तीन भागांत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आज त्याच्या तिसऱ्या भागाचे अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यानंतर बोलताना शाह म्हणाले, “दिल्ली मी येथे दिल्ली निवडणुकीसाठी संकल्प पत्राचा (जाहीरनामा) शेवटचा भाग प्रकाशित करण्यासाठी आलो आहे. आम्ही निवडणुकांना सार्वजनिक संपर्काचे माध्यम मानतो, आम्ही जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये जातो. भाजपसाठी संकल्प पत्र हा एक महत्त्वाचा विषय आणि निवडणुकीनंतर करावयाच्या कामांची यादी आहे.”

“ही केवळ कागदावर दिलेली आश्वासने नाहीत. २०१४ पासून, पंतप्रधान मोदींनी विकास कामांचे राजकारण स्थापित केले आहे आणि भाजपानेही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे,” असे ते पुढे म्हणाले.

यावेळी तरुणांच्या रोजगारीवर बोलताना शाह म्हणाले की, “आमचा पक्ष २० लाख स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने रस्ते बांधणीवर ४१,००० कोटी रुपये, रेल्वे लाईन टाकण्यासाठी १५,००० कोटी रुपये आणि दिल्लीतील विमानतळांसाठी २१,००० कोटी रुपये खर्च केले आहेत.”

यावेळी अमित शाह यांनी, दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन झाले तरी, दिल्लीत सध्या सुरू असलेल्या कोणत्याही योजना बंद करणार नसल्याचे आश्वसनही दिले आहे.

भाजपाच्या जाहीरनाम्यात दिल्लीकरांसाठी काय काय ?

  • गिग कामगारांना (ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांतील कामगार) १० लाख रुपयांपर्यंत जीवन विमा आणि ५ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा.
  • वस्त्रोद्योग कामगारांना १० लाख रुपयांपर्यंत जीवन विमा, ५ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा आणि टूलकिट प्रोत्साहन म्हणून १५,००० रुपये.
  • बांधकाम कामगारांना टूलकिट प्रोत्साहन १०,००० रुपये, ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज, ५ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा आणि १० लाख रुपयांपर्यंत जीवन विमा दिला जाईल.
  • तरुणांना ५०,००० सरकारी नोकऱ्या, २० लाख रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी, गरजू विद्यार्थ्यांना मेट्रोमध्ये मोफत प्रवासासाठी एनसीएमसीमध्ये दरवर्षी ४००० रुपये.
  • मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधी आणि वकिलांना १० लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा आणि १० लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य आणि अपघात विमा.
  • भव्य महाभारत कॉरिडॉर विकसित करणार.
  • यमुना नदीचे पुनरुज्जीवन करून यमुना रिव्हर फ्रंट विकसित केला जाईल.
  • हाताने मैला साफ करण्याचे काम १०० टक्के बंद केले जाईल, कामगारांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी देण्यात येतील.
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabharata corridor yamuna riverfront bjp delhi manifesto 50k government jobs amit shah aam