दयानंद लिपारे
कोल्हापूर : सलग पाच निवडणुकातील पराभवआणि महत्त्वाच्या संस्थांतील राजकीय अस्तित्वाला हादरा यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकेकाळी वर्चस्व गाजवणाऱ्या महाडिक गटाचे अस्तित्व राजकीय दृष्ट्या क्षीण झाले होते. मात्र राज्यसभा निवडणुकीच्या यशाने रातोरात महाडिक गटाला उभारी मिळाली आहे. खासदारकी परत मिळाल्याने धनंजय महाडिक यांचे महत्त्व वाढीस लागले असून कोल्हापूर जिल्ह्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रभाव वाढीस लागला आहे. यापुढे कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा तुल्यबळ सामना पाहायला मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रबळ राजकीय गट म्हणून महाडिक गटाची ओळख होती. अगदी चार-पाच वर्षापूर्वी या कुटुंबात खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी राजकीय महत्वाची पदे आणि गोकुळसारख्या महत्त्वाच्या संस्थेवर वर्चस्व होते. नंतरच्या काळात त्यास उतरती कळा लागली.
धनंजय महाडिक यांनी संसदेत जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. त्यात काही वेळा यश आले तर अनेकदा यशाने हुलकावणी दिली. पहिल्याच निवडणुकीत ते सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभूत झाले. पुढच्या निवडणुकीत त्यांनी लोकसभे ऐवजी विधानसभेचा मार्ग धरला. याही निवडणुकीत ते सतेज पाटील यांच्याकडून पराभूत झाले. नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मोदी लाटेतही ते संसदेत पोहोचू शकले. खासदार म्हणून त्यांची कामगिरीही प्रभावी झाली. विकासकामांवरही भर होता. लोकसंपर्क चांगला होता. दोन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला होता. मात्र जिल्ह्यातील नेत्यांशी त्यांचे बिनसले. मागील लोकसभा निवडणुकीवेळी सतेज पाटील यांनी ‘ आमचं ठरलंय ‘ हे घोषवाक्य घेऊन शिवसेनेचे संजय मंडलिक यांना पाठबळ देऊन निवडून आणले. तेव्हा महाडिक यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर वर्षभराने महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दोन वर्षाच्या अंतरानंतर आता ते राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संसदेत पोहोचले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा