Mahakumbh 2025 Vishva Hindu Parishad Meetings for free temples from govt control : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ मेळा चालू आहे. दरम्यान, या मेळ्यासाठी आलेल्या साधूंच्या काही बैठका नुकत्याच पार पडल्या आहेत आणि काही बैठका पुढील काही दिवसांमध्ये होत आहेत. या बैठकांमध्ये काही धार्मिक व राजकीय विषयांवर चर्चा झाली. मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे व मुस्लीम वास्तूंवरील हिंदू संघटनांच्या दाव्यांसंबंधीच्या मुद्यांवर चर्चा झाली. संभलमधील मशीद व अजमेर दर्गा हिंदूंची मंदिरं तोडून उभारल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. याविषयी पुढील चर्चेसाठी विश्व हिंदू परिषदेने २४ ते २७ जानेवारी दरम्यान प्रयागराजमध्ये देशभरातील हिंदू अध्यात्मिक गुरू व साधूंचा समावेश असलेल्या मार्गदर्शक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. मंदिरं सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे हा विश्व हिंदू परिषदेचा प्रमुख अजेंडा असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी देशव्यापी मोहीम आयोजित करण्याची तयारी विहिंपने सुरू केली आहे. या मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत सहभागी होणारे प्रतिनिधी त्यांचे स्वतःचे व हिंदू समाजाशी संबंधित मुद्दे उपस्थित करतील. हिंदू समाजातील इतर प्रतिनिधिंनी इतर समकालीन मुद्दे देखील उपस्थित केले आहेत. त्यावरही पुढील बैठकांमध्ये चर्चा होऊ शकते, असं विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनोद बन्सल म्हणाले, “मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीनंतर विश्व हिंदू परिषदेच्या प्रन्यास मंडळाची बैठक होईल. मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत ज्या सूचना केल्या जातील त्या पुढे नेण्याचं काम प्रन्यास मंडळाच्या बैठकीतून होईल. सूचनांची अंमलबजावणी कशी करायची यावरही चर्चा होईल”. दरम्यान, या बैठकीला देशभरातील शेकडो साधूसंत उपस्थित राहण्याची अपेक्षा बन्सल यांनी व्यक्त केली आहे. बैठकीच्या पहिल्या दिवशी प्रमुख मार्गदर्शक, दुसऱ्या दिवशी साध्वी, तिसऱ्या दिवशी संत व चौथ्या दिवशी तरुण साधू उपस्थित राहतील. साधूसंत अजेंडा ठरवतात व विश्वस्त मंडळ त्याची अंमलबजावणी करतात. बांगलादेशमधील सध्याची स्थिती, लव्ह जिहाद, हिंदूंची घरवापसी व धर्मांतराच्या मुद्द्यांवरही या बैठकांमध्ये चर्चा होऊ शकते, असं बन्सल यांनी सांगितलं.

विश्व हिंदू परिषदेची उद्दीष्टे काय?

जातीभेद ओलांडून हिंदू एकतेला प्रोत्साहन देणे हा या बैठकीतील प्रमुख अजेंडा असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे की देशातील विरोधी पक्ष सातत्याने हिंदूत्वविरोधी कारवाया करत आहे. त्याविरोधात हिंदू साधूसंत काय करू शकतात यावरही चर्चा होऊ शकते. “अनेक वर्षांपासून हिंदू संघटना राम मंदिर बांधण्यासाठी आग्रही होत्या. आता राम मंदिर बांधण्याचं ध्येय पूर्ण झालं आहे. आता प्रत्येक घरांत राम पोहोचवणं हे आमचं ध्येय आहे”, असं बन्सल यांनी सांगितलं. देशात सामाजिक सलोखा निर्माण करणे हे देखील आमचं उद्दीष्ट आहे. कुंभमेळ्याद्वारे हा सलोखा निर्माण करता येईल असं आम्हाला वाटतं, असं बन्सल म्हणाले.

हिंदुत्वाचा कार्यक्रम तळागाळात नेण्याविषयी चर्चा होणार

विहिंपचे विनोद बन्सल म्हणाले, “कुंभमेळा हे सामाजिक सलोख्याचं एक उदाहरण आहे. सर्व स्तरातील, वेगवेगळ्या जातींचे, वेगवेगळ्या समुदायांचे लोक सर्व मतभेद विसरून गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी एकत्र येतात. आपल्या वसाहतवादी भूतकाळातील जातीय व्यवस्था व अस्पृष्यता मागे टाकून एक मजबूत व संयुक्त राष्ट्र बनवण्याची वेळ आली आहे”. दरम्यान, सूत्रांनी सांगितलं की विहिंपच्या बैठकांमध्ये हिंदुत्वाचा कार्यक्रम तळागाळात नेण्याविषयी चर्चा होईल. तो देखील विहिंपचा अजेंडा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh 2025 vishva hindu parishad meetings of saints to free temples from govt control hindu claims on mosques asc