अकोला : विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यात मतदानामध्ये निर्णायक वाढ झाली. वाढलेले मतदान नेहमीच भाजपच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. मात्र, यावेळेस वाढलेल्या मतांमध्ये मुस्लीम व दलितांच्या मतांचा देखील मोठा टक्का दिसून येतो. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढलेली ७.१८ टक्के मते कुणाच्या पथ्यावर पडणार, यावरून आता दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात ६४.९८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ७२.८० टक्के मतदान बाळापूरमध्ये झाले असून सर्वात कमी ५७.५१ मतदारांनी अकोला पश्चिम मतदारसंघात आपला हक्क बजावला. अकोला पूर्वमध्ये ६१.६३ टक्के, अकोट ६८.१७ व मूर्तिजापूर मतदारसंघात ६६.२४ टक्के मतदान झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण ५७.८० टक्के मतदान झाले होते. आता त्यामध्ये तब्बल ७.१८ टक्के मतांची वाढ झाली. अकोला पूर्व मतदारसंघात गेल्या वेळेस ५५.७७ टक्के मतदान झाले होते. आता त्यामध्ये ५.८६ टक्क्यांनी वाढ झाली. अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर, शिवसेनेचे गोपाल दातकर व वंचितचे ज्ञानेश्वर सुलताने यांच्यात लढत झाली. वाढलेल्या मतांचा कौल कुणाच्या बाजूने यावरून चर्चा होत आहे. या मतांमध्ये युवांसह महिला मतदारांचा मोठा सहभाग आहे. भाजपच्या दृष्टीने वाढलेले मतदान पोषक करण्याची चिन्हे आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघात गेल्या वेळेस भाजप व काँग्रेसमध्ये काट्याची लढत झाली होती. या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत ५०.८२ टक्के मतदान झाले होते. आता त्यामध्ये ६.६९ टक्क्यांनी वाढ झाली. अकोला पश्चिममध्ये भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान व वंचित समर्थित अपक्ष हरीश आलिमचंदानी यांच्यात लढत झाली. या मतदारसंघातील लढतीला धार्मिक रंग चढला होता. मतदारसंघात हिंदुत्ववादी मतदान वाढल्याचे बोलल्या जात आहे.
हेही वाचा >>>विक्रमी मतदानामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला; ‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणाम?
अकोट मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आता ४.३४ टक्क्यांनी मतदान वाढले. भाजपचे प्रकाश भारसाकळे व काँग्रेसचे ॲड. महेश गणगणे यांच्यात तुल्यबळ लढत असून वंचितमुळे होणाऱ्या मतविभाजनावर समीकरण ठरणार आहे. बाळापूर मतदारसंघात ७२.८० टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ६.९१ टक्के मतदान वाढले. याठिकाणी वंचितचे खतीब, शिवसेना शिंदे गटाचे सिरस्कार व शिवसेना ठाकरे गटाचे देशमुख यांच्यात तुल्यबळ सामना झाला. बाळापूरमध्ये मुस्लिमांची भूमिका निर्णायक ठरेल. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मूर्तिजापूर मतदारसंघात देखील मतदान ५४.४२ वरून ६६.२४ टक्क्यांवर गेले. याठिकाणी भाजपचे हरीश पिंपळे, वंचितचे डॉ. सुगत वाघमारे व राष्ट्रवादीचे डोंगरदिवे यांच्यात लढत झाली. बौद्ध व इतर समाजाच्या गठ्ठा मतांचे विभाजन मूर्तिजापूरमध्ये महत्त्वपपूर्ण आहे.
लोकसभेच्या तुलनेत सुद्धा ३.१९ टक्क्यांनी वाढ
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत देखील आताच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ३.१९ टक्के मतदान वाढले आहे. लोकसभेमध्ये तीन मतदारसंघात भाजप, तर दोन ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतली होती. भाजपची अकोला पूर्वतील आघाडी निर्णायक ठरली होती.