गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी भाजपने राज्यभरात बंडखोरी केलेल्या नेत्यांवर कारवाई केली. परंतु अहेरीतील बंडखोर उमेदवार अम्ब्रीशराव आत्राम यांचा त्यात समावेश नाही. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली असून आत्रामांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याठिकाणी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे उमेदवार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्राम राजघराण्याचे वर्चस्व असलेल्या अहेरी मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांचे पुतणे तथा भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी बंडखोरी केली. त्यांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना अपयश आले. त्यामुळे येथे भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. अनेक भाजप पदाधिकारी अम्ब्रीशराव आत्राम यांच्या समर्थनात प्रचार करताना दिसून येत आहेत. तर काही मोजके नेते महायुतीसोबत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी अशाचप्रकारची बंडखोरी झाली होती. यातील अनेकांचे बंड शमवण्यात भाजपला यश आले. गडचिरोलीतही उमेदवारी नाकारलेल्या विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी माघार घेतली. त्यांची समजूत काढण्यासाठी आमदार परिणय फुके यांना पाठविण्यात आले होते. मात्र, अम्ब्रीशराव आत्राम यांचे बंड शमवण्यासाठी असे कुठलेच प्रयत्न केल्या गेले नाही. भाजपने बंडखोरांवर केलेल्या कारवाईत अम्ब्रीश आत्राम यांना अभय देण्यात आले. यासंदर्भात जिल्ह्यातील भाजप नेते देखील अनभिज्ञ आहेत. अम्ब्रीशराव आत्राम यांची देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळे अजित पवारांची कोंडी करण्यासाठी फडणवीसांची ही राजकीय खेळी तर नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – शहरापेक्षा नागपूर ग्रामीणमध्ये चुरस अधिक, कुठे बंडखोरी, तर कुठे प्रस्थापितविरोधी लाट

हेही वाचा – Deoli Vidhan Sabha Constituency : भाजपचा निर्धार यावेळी तरी देवळीत यशस्वी ठरणार का…

..तर अजित पवार गट काम करणार नाही

भाजपने बंडखोरांवर कारवाई केली. पण यात गडचिरोलीचा समावेश नव्हता. अहेरी विधानसभेत अम्ब्रीशराव आत्राम यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीत खदखद आहे. अहेरीत भाजप विरोधात गेल्यास जिल्ह्यातील उर्वरित दोन विधानसभेत अजित पवार गट भाजपला सहकार्य करणार नाही. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजप आता काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.