छत्रपती संभाजीनगर : शहरातील पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी काही कार्यकर्त्यांकडून खुलेआम पैसे वाटप करून मतदान खरेदी केले. त्यात काही मतदान बोगस असल्याचा आरोप करत माजी खासदार तथा पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार बैठकीत काही चित्रफिती पुरावे म्हणून सादर केल्या. चित्रफितींचे पुरावे केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी इम्तियात जलील यांनी आपल्याला निवडणूक आयोग व पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करावेसे वाटत आहे. संपूर्ण निवडणुकीत पोलिसांची बघ्याची भूमिका राहिली आहे. भारतनगरमध्ये आपण स्वत: पोहोचलो तर तेथे जालिंदर शेंडगे हे दलित कार्यकर्ते सहकाऱ्यांची झुंड घेऊन आले व त्यांनी बोगस मतदान करून घेतले. त्याचे काही पुरावे चित्रफितींच्या रुपात आपल्याजवळ आहेत. तेथे एका महिला अंमलदाराने आपल्याशी हुज्जत घातली. उलट आपल्याविरोधातच पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा पूर्णत: खोटा असल्याचा दावाही त्यांनी केला.
पठाण यांच्याबाबतही संशयाची सूई
पत्रकार बैठकीत एका पत्रकाराने शकिला पठाण या उमेदवाराबाबत प्रश्न विचारल्यानंतर इम्तियाज जलील यांनी थेट उत्तर न देता त्यांच्याबाबतही संशयाची सुई उपस्थित केली. तुम्ही त्यांचे काही नातेवाईक आहात का, असा प्रतिप्रश्न इम्तियाज जलील यांनी केला. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानंतर इम्तियाज जलील यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्या पत्रकाराला बाहेर नेले. त्यावरून गोंधळ उडाला. त्याचवेळी जलील यांनी पत्रकार बैठक गुंडाळली.